मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं दिलेल्या सुचनेनुसार राज्यातील अनेक मंदिरं बंद करण्यात आली आहेत. त्यात तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, शेगावचं गजानन महाराज मंदिर, नृसिंहवाडीचं दत्त मंदिर, जेजुरीचं खंडोबा मंदिर मंगळवारपासून (17 मार्च) दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. तर शिर्डीचं साईबाबा मंदिरही दुपारी तीन वाजल्यापासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गणपतीपुळे, मुंबादेवी, परळी वैद्यनाथ मंदिरंही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल आहे.


परळी वैद्यनाथाचे मंदिर

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस चा प्रतिबंध घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. परळी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. इतिहासात पहिल्यांदाच वैद्यनाथ मंदिर बंद करण्यात आल्याने भाविकांमध्ये नाराजी दिसून आली. मध्यरात्री वैद्यनाथाची पूजा करून मंदिर बंद करण्यात आलं, आता पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर कमिटीने घेतला आहे. दरम्यान वैद्यनाथाच्या दैनंदीन षोडशोपचार पूजा नित्य पुजाऱ्यामार्फत केल्या जाणार आहेत. मात्र यावेळी कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे भाविकांनी देखील सहकार्य करावे अशी विनंती यावेळी करण्यात आली.

शेगाव येथील गजानन महाराज मंदिर

कोरोनाच्या प्रादुर्भाव मोठा प्रमाणात वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी सरकारनं मंदिरांना केलेल्या आवाहनाला शेगावच्या गजानन महाराज मंदिरानंही प्रतिसाद दिला आहे. बुलडाणातील शेगावमधील गजानन महाराजांची दर्शन सुविधा 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. तर गजाजन महाराज संस्थानचे सर्व उत्सव आणि कार्यक्रम 30 एप्रिलपर्यंत बंद करण्यात आले आहेत.

सिद्धीविनायक मंदिर

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भक्तांची गर्दी वाढून कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने ही खबरदारी घेतलीये.

तुळजापूर मंदिर

तुळजाभवानीचं मंदिर आज पहाटे ५ वाजता विधिवत पूजा करुन दर्शनासाठी बंद करण्यात आलं. सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि मंदिर संस्थानाने घेतला आहे.

पंढरपूर मंदिर

पंढरपूर विठ्ठल रुक्माई मंदिर आजपासून भक्तांना दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय पंढरपूर देवस्थान विश्वस् मंडळाने घेतला आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर भक्तांच्या हितासाठी मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती पंढरपूर देवस्थान चे विश्वस्त आमदार राम कदम यांनी दिली आहे.

देहू संत तुकाराम महाराज मंदिर

देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे मंदिर आज पासून बंद केलं जाणार. लाखो वारकऱ्यांचे हे श्रद्धास्थान आहे, पण आता या वारकऱ्यांना पुढील आदेश येईपर्यंत तुकोबांचे दर्शन घेता येणार नाही.

शिर्डी साई मंदिर

शिर्डीतही साई मंदिर दर्शनासाठी दुपारी 3 वाजल्यापासून अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय झालाय. मात्र मंदिरातील दैनंदिन पुजाविधी मात्र सुरुच राहणार असल्याचं कळतं आहे.

कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर मध्यरात्रीपासून बंद राहण्याची शक्यता आहे.. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि देवस्थान समितीचे अध्य़क्ष महेश जाधव यांच्यात आज बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आ

जेजुरी खंडोबा मंदिर

जेजुरीच्या खंडेरायाचं मंदिरही आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात आलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ आणि मानकऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. त्यामुळं ३१ मार्चपर्यंत जेजुरीचं मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे.

Coronavirus | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपूरचं विठ्ठल मंदिर बंद ठेवणार | ABP Majha



कळंब चिंतामणी गणेश मंदिर

यवतमाळमधल्या कळंबमधील प्रसिद्ध चिंतामणी गणेश मंदिर देवदर्शनासठी बंद करण्यात आलं आहे. किती तारखेपर्यंत हे बंद असेल हे मात्र अजून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

मुंबई सिद्धीविनायक मंदिर

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. भक्तांची गर्दी वाढून कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.

टिटवाळा महागणपती मंदिर

टिटवाळ्याचं महागणपती मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे दररोज इथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून टिटवाळा महागणपती मंदिर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेतलाय. मात्र असं असलं, तरी मंदिरातली पूजा, आरती सुरू राहणार असून मंदिराच्या बाहेरून भाविकांना मुखदर्शन घेता येणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त सुभाष जोशी यांनी दिली आहे.
वणी सप्तश्रृंगी देवी मंदिर

मात्र राज्यातील कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहता सप्तश्रृंगी निवासीनी ट्रस्ट, प्रशासन आणि ग्रामपंचायतीन चैत्र उत्सव रद्द केला आहे. शिवाय बुधवारपासून (18 मार्च) गडावर येणा-या भाविकांसाठी देवीचे दर्शन बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय आज ग्रामस्थ आणि ट्रस्ट यांच्यात घेण्यात आला आहे. ट्रस्टचे अन्न छत्रालय तसेच भाविकांच्या निवासाची सोय असलेले संकुल बंद ठेवण्यात येणार आहे. देवीचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात येणार असले तरी देवीच्या नित्यपुजा मात्र सुरु राहणार असल्याच ट्रस्टतर्फे कळविण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

CoronaVirus Effect | कोरोनाच्या फटक्याने जालन्याच्या मोसंबीचे भाव गडगडले

Coronavirus | कोरोनापासून बचावासाठी बजरंगबलीला साकडं, मास्कही घातलं

Coronavirus | असंवेदनशीलता... रुग्णालयात कोरोनाचे पेशंट असल्याने विष प्यायलेल्या तरुणाला उपचारासाठी नेण्यास नकार, तरुणाचा उपचाराविना मृत्यू

Coronavirus | देवस्थानांनाही कोरोनाचा धसका; अनेक मंदिरं दर्शनासाठी बंद, वणी गडावरचा चैत्रोत्सवही रद्द