धुळे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वच योग्य ती काळजी घेत आहेत. कोरोना व्हायरसची लागण होऊ नये, यासाठी लोक सॅनिटायझर आणि मास्कचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी धुळ्यात हनुमानाला साकडं घालण्यातच आलं. यावेळी बजरंगबलीला देखील मास्क घालण्यात आलं.


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात पसरल्याचे पाहायला मिळत आहे. हा प्रादुर्भाव जास्त वाढू नये, यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारतर्फे वेगवेगळ्या उपाययोजना देखील राबवल्या जात आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना चेहऱ्याला मास्क लावुनच बाहेर पडावे, अशा सूचना आरोग्य विभागाकडून वारंवार देण्यात येत आहेत. म्हणूनच नागरिकांनी आता देवांना देखील चक्क मास्क लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


प्रत्येक संकटातून वाचवणाऱ्या संकटमोचक हनुमानाला मास्क लावून भाविकांनी बजरंगबलीला या आजारापासून सर्वांचे रक्षण करण्यासाठी साकडं घातलं आहे. धुळे कृषी महाविद्यालयाजवळ असलेल्या हनुमान मंदिरात हनुमानाला मास्क लावून आपल्या भक्तांचे कोरोनापासून रक्षण करण्याविषयी भाविकांनी बजरंग बलीला साकडं घातलं आहे. धुळ्यात अद्यापपर्यंत तरी कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र नागरिक आपापल्या परिने योग्य ती खबरदारी आणि काळजी घेत आहेत.




संबंधित बातम्या