Unseasonal Rains: राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार आणि विविध संस्थांकडून आर्थिक मदतीशिवाय इतर मार्गाने मदत दिली जात आहे. आता, सरकारी-कर्मचारी अधिकारीदेखील आपला एक दिवसाचा पगार देणार आहे. राज्य सरकारने याबाबतचे आवाहन शासकीय कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांना केले  आहे. जून महिन्यातील एक दिवसाचा पगार जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


राज्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rains) आणि गारपिटीने (Hailstorm) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडीशी आलेले पिक गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशा स्थितीत राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना एक दिवसाचं वेतन जमा करण्याचे आवाहन केलं आहे. जून महिन्यातील एक दिवसाच वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांकडून या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला जाण्याची शक्यता आहे. 


मार्च एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाची नुकसानभरपाई अद्याप नाही


मान्सूनच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मार्च एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाची नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही.  शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याच्या घोषणा करणाऱ्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे का? असा सवाल आता बळीराजा उपस्थित करत आहेत.. कारण हजारो शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून बसले आहेत. 


एकीकडे मान्सूनची प्रतिक्षा असल्यानं शेती काम रखडले आहेत, दुसरीकडे कांद्यासह शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही, त्यातच मे महिन्याच्या अखेर पर्यंत आलेल्या अवकाळी पावसाचा शेतीपिकांना फटका बसला असून शेतीमाल फेकून देण्याची वेळ येत आहे या सर्व अस्मानी सुलतानी संकटांचा सामना करत असताना सरकार आपल्या पाठीशी असल्याचा आधारही या बळीराजाच्या नशिबी नसल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे. 


राजपत्रित अधिकाऱ्यांनी दिले होते एक दिवसाचे वेतन


महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाच्या अधिकाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा निधी देण्यात आला. एप्रिल महिन्यातच हा निर्णय घेण्यात आला होता. 


महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ हा राज्यातील विविध खात्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या 70 खातेनिहाय संघटनांची शिखर संघटना आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध खात्यांमध्ये जवळपास दीड लाख राजपत्रित अधिकारी आहे. 


राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाखा तर अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकं बाधित झाली आहेत.