अकोला : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी सहायकांच्या परिक्षेला फटका बसला आहे. 14 नोव्हेंबरला अकोल्यात होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. या 47 जागांसाठी राज्यभरातून साडेसहा हजारांवर उमेदवार ही परीक्षा देणार होते. अकोल्यातील 16 केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. एसटीच्या संपामुळे राज्यभरातील परीक्षार्थींनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. ही परीक्षा समोर ढकलण्याची मागणी राजकीय नेते, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी सरकार आणि विद्यापीठाकडे केली होती. या मागणीच्या रेट्यामुळे विद्यापीठाने आज एक बैठकीत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परीक्षेची नवी तारीख विद्यापीठ प्रशासन लवकरच जाहीर करणार आहे.


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा परीक्षेला फटका : 


डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील कृषि सहायक पदाच्या 47 जागांसाठी 14 नोव्हेंबर रोजी परीक्षा होणार होती. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील अंदाजे 6 हजार 500 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. परंतु सध्याच्या परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे बसगाड्या बंद आहेत. रेल्वेच्याही मर्यादित गाड्या सुरू आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थी कृषी विद्यापीठातील जागांच्या परीक्षेला मुकण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह अनेकांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून गुरूवारी केली होती.


अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात 47 कृषि सहाय्यक पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. जवळपास साडेसहा हजारांवर विद्यार्थ्यांनी कृषि सहाय्यक पदासाठी कृषि विद्यापीठाकडे अर्ज केले. त्यानुसार कृषि विद्यापीठ प्रशासनाकडून 14 नोव्हेंबर रोजी अकोल्यातील 16 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे राज्यात सर्वच ठिकाणी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांच्या फेऱ्या बंद आहेत. तसेच कोरोनामुळे रेल्वेच्या विशेष गाड्या वगळता पॅसेंजर बंद आहेत. त्यामुळे 14 नोव्हेंबरच्या परीक्षेला जावे तरी कसे? असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत होता. कृषि सहाय्यक पदासाठी परीक्षेला बसणारे सर्वाधिक विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आणि शेतकऱ्याची मुले आहेत. ग्रामीण भागात बसगाड्या बंद असल्यामुळे परीक्षेच्या ठिकाणी कसे जावे. याची चिंता विद्यार्थ्यांना सतावत होती. बसगाड्या बंद असल्यामुळे हजारो विद्यार्थी कृषि सहाय्यकाच्या परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी व एसटीचा संप मिटल्यावर परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरातून झाली होती. अखेर या रेट्यामुळे विद्यापीठाला परिक्षा समोर ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला. 


परीक्षा तिसऱ्यांदा ढकलली समोर : 


   डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नोव्हेंबर 2019 मध्ये कृषी सहायकांच्या 47 पदांसाठी जाहिरात काढली होती. यासाठी मार्च 2020 मध्ये ही परिक्षा होणार होती. मात्र, त्यानंतर उद्भवलेल्या कोरोना परिस्थितीमुळे ही परीक्षा पहिल्यांदा ही परिक्षा समोर ढकलावी लागली. त्यानंतर आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या घोळाच्या काळात आसपासच्या तारखांमुळे दोन महिन्यांपूर्वी ही परीक्षा समोर ढकलली गेली होती. आज तब्बल तिसऱ्यांदा ही परिक्षा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामूळे समोर ढकलण्याची नामुष्की सरकार आणि विद्यापीठावर आली आहे. त्यामुळे आता पुढे ही परिक्षा नेमके होणार कधी?, याकडे परिक्षार्थींचे लक्ष लागले आहे. 


अनेकांच्या मागणीनंतर घेतला परीक्षा समोर ढकलण्याचा निर्णय : 


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर पोहोचण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे अनेकजण परिक्षेला मुकण्याची भीती होती. ही बाब लक्षात घेत विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती विविध माध्यमातून सरकार आणि विद्यापीठाकडे केली होती. यासोबतच माजी कृषीमंत्री आणि भाजपा नेत डॉ. अनिल बोंडे, कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे सदस्य मोरेश्वर वानखडे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक सरनाईक यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि विद्यापीठाकडे केली होती. या मागणीच्या पाठपुराव्यानंतर अखेर विद्यापीठाने सर्व परिस्थितीचा चौफेर आढावा घेत ही परिक्षा पुढे ढकलली आहे.