Shiv Sena Shivdanushya Yatra : उद्धव ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) शिवसंवाद आणि शिवगर्जना यात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून (Shiv Sena)  शिवधनुष्य यात्रेने उत्तर देण्यात येणार आहे. यात्रेदरम्यान सर्व सहा महसुली विभागात मुख्यमंत्र्यांची एक सभा होणार आहे. अयोध्येतून आणलेला शिवधनुष्य राज्यभर फिरवणार आहेत. ग्रामीण भागावर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी दिली आहे. 


उद्धव ठाकरे गटाच्या सध्या सुरु असलेल्या शिवगर्जना यात्रेला जोरदार प्रतिउत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची "शिवधनुष्य यात्रा" राज्यात सुरु होणार आहे. नागपुरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यासंदर्भात तयारीही सुरु केल्याची माहिती शिवसेनेचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी एबीपी माझाला दिली आहे. ही 'शिवधनुष्य यात्रा' मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकापासून सुरु होईल. मात्र, त्यापूर्वी शिवधनुष्य यात्रेत राज्यभर फिरवला जाणारा खास शिवधनुष्य अयोध्येतून बाळासाहेबांच्या स्मारकावर आणला जाणार आहे. या यात्रेत एकनाथ शिंदे सर्व ठिकाणी फिरणार नसले तरी प्रत्येक महसुली विभागात त्यांची एक मोठी सभा घेण्याचे नियोजन शिवसेनेने केले आहे.


कशी असणार शिवसेनेची शिवधनुष्य यात्रा?



  • अयोध्येतून आणलेले शिवधनुष्य बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी नेऊन महाराष्ट्रभर यात्रा सुरु होईल

  • ठाकरे गटाच्या आजवरच्या आरोपांना शिंदे गटाकडून उत्तर दिले जाईल

  • यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहा महसुली विभागात घेणार सहा सभा 

  • मार्च अखेरीस नागपुरात मोठ्या सभेचे नियोजन

  • शिवधनुष्य यात्रेच्या माध्यमातून एकसंघ शिवसेना असताना ज्या ग्रामीण भागात शिवसेनेचा जोर होता त्या ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले जाणार 


मार्च महिन्याच्या शेवटी नागपुरात एकनाथ शिंदे यांची मोठी सभा घेण्यासाठी तयारी सुरु केल्याचे तुमाने म्हणाले. या शिवधनुष्य यात्रेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाला जोरदार प्रतिउत्तर तर दिले जाईलच. शिवाय राज्यातील कानाकोपऱ्यात गावा खेड्यात आता शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यास नेतृत्वात काम करेल हे नवे राजकीय समीकरणही रुजविले जाणार आहे.


पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर 'शिवधनुष्य' यात्रेचं आयोजन 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिवधनुष्य यात्रेला लवकरच महाराष्ट्रात सुरुवात होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालानंतर शिंदेंच्या पक्षाला मिळालेलं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह त्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेणार आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान, माझा धनुष्यबाण या घोषवाक्याने शिवसेनेकडून शिवधनुष्य यात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे.