शिर्डी : साई संस्थानचे विदेशी चलनाचे खाते ( FCRA ) केंद्रीय गृहमंत्रालयाने 6 जानेवारीपासून गोठवण्यात आले आहे. यामुळे संस्थानचे 30 लाखांचे विदेशी चलन अडकून पडले असून देशभरातील जवळपास सहा हजार तर महाराष्ट्रातील 1 हजार 263 अशासकीय संस्थांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे एफसीआरए कायद्यानुसार 31 डिसेंबर 2021 पर्यंत खात्याचे नूतनीकरण न केल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये साईबाबा संस्थानसह तिरूपती देवस्थानाचाही समावेश आहे. गृह मंत्रालायच्या आयबी विभागाकडून कागदपत्रांची पडताळणी अद्याप न झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. साईबाबा संस्थान याबाबत पाठपुरावा करत असून लवकरच खाते पूर्ववत सुरू होईल अशी माहिती साईबाबा संस्थानच्या वतीनं देण्यात आलीय..
साईबाबा हे जगातील भाविकांचे श्रद्धास्थान असून देशातील भाविकांप्रमाणेच परदेशी भाविक सुद्धा साईंच्या झोळीत दान करतात. दानाच्या स्वरूपात येणार विदेशी चलन वापरण्यासाठी साईबाबा संस्थानला देशाच्या गृहमंत्रालयाच्या परकीय चलन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र दिलं जात व मुदत संपण्यापूर्वी हे प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याची प्रक्रिया केली जाते. 1 नोव्हेंबर 2016 ला नूतनीकरण केलेल्या प्रमाण पत्राची 31 डिसेंबर 2021 ला मुदत संपली. त्यापूर्वी साईबाबा संस्थानावर न्यायालयाने नेमलेली तदर्थ समिती कामकाज पाहत असल्यानं नूतनीकरण कागदपत्र सादर करण्यास विलंब झाला आणि राज्य सरकार ने नेमलेल्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्ती नंतर 25 डिसेंबर 2021 ला कागदपत्र पूर्तता करून गृहमंत्रालयाला नूतनीकरण प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र सदर कागदपत्रांची छाननी गृह मंत्रालयाच्या आय बी विभागाकडून अद्याप न झाल्याने साईबाबा संस्थान चे विदेशी चलन खाते 6 जानेवारी पासून गोठविण्यात आले असून गेल्या महिन्या भरात तब्बल 30 लाखांची रक्कम यात अडकली असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे विश्वस्त अॅड. सुहास आहेर यांनी दिली आहे.
दरम्यान प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी साईबाबा संस्थान पाठपुरावा करत असून जो पर्यंत नूतनीकरण होत नाही तोपर्यंत विदेशी दान स्वीकारण्यास अडचण निर्माण झाली आहे. जे विदेशी चलन 6 जानेवारीपूर्वी जमा झाले आहे त्याचा भरणा सुद्धा करता आलेला नाही. ज्या भक्तांनी दक्षिणा पेटीत विदेशी चलन दान केले आहे त्यांची ओळख पटविणे अशक्य असून विदेशी चलन घेताना सदर व्यक्तीचे ओळखपत्र बंधनकारक केल्याने अनेक अडचणी संस्थान समोर निर्माण झाल्या आहेत.