मुंबई : राज्याच्या राजकारणात 50 खोक्यांवरून सुरु झालेला वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे. खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा शिंदे गटानं दिलाय. सुप्रिया सुळे, अजित पवार आणि आदित्य ठाकरेंवर मानहानीचा दावा ठोकू असं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी सांगितलं आहे.  


कायदेशीर कारवाईचा इशारा


शिवसेनेतील बंडानंतर 50 खोके, एकदम ओके अशी घोषणाबाजी विधिमंडळ पायऱ्यांवरच्या आंदोलनात झाली आणि पुढे त्यावरून शिंदे गटाच्या आमदारांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या शिर्डीच्या अधिवेशनात खोक्यांवर टीका केली आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांना शिवराळ भाषेत उत्तर दिलं. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण पुन्हा तापलं. त्यानंतर शिंदे गटानं आता कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. 


पहाटेच्या शपथविधी वेळी अजितदादांनी किती खोके घेतले, शिवतारेंचा सवाल


 राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या शिर्डीच्या अधिवेशनात खोक्यांवर टीका केली. त्यावर  शिवतारे म्हणाले माझा सुप्रिया सुळेंना सवाल आहे. शिवतारे म्हणाले,  माझा अजित पवारांवर विश्वास आहे. मात्र पहाटेच्या शपथविधी वेळी अजितदादांनी किती खोके घेतले. हे विचारून महाराष्ट्राच्या जनतेचे सांगावे. 1978 साली शरद पवारांनी शरद पवारांनी सरकार स्थापन करण्यासाठी 38 आमदार फोडले होते. त्यावेळी शरद पवारांनी किती खोके दिले हे देखील आम्हाला सुप्रिया सुळेंनी आम्हाला सांगावे. 


50 खोके एकदम ओके ही घोषणा राज्यभर पोहोचली 


एकनाथ शिंदे चाळीस आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वादासाठी आम्ही बाहेर पडलो. ही तत्त्वांची लढाई आहे असं शिंदे यांनी सांगितलं. पण महाविकास आघाडीतील नेत्यांनी याला तत्वांची नाही तर खोक्यांची लढाई करुन टाकली. गेल्या काही दिवसात 50 खोके एकदम ओके ही घोषणा राज्यभर पोहोचली.  राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार येऊन चार महिने झाले आहेत. मात्र ही घोषणा काय आजही टीका करताना दिली जाते.


विधीमंडळाच्या पायऱ्यांवर 50 खोक्यांवरुन गदारोळ


बच्चू कडू, रवी राणा यांच्या पुरताच 50 खोक्याचा वाद रंगला असं नाही. तर गेल्या अधिवेशनात थेट विधिमंडळाच्या पायऱ्यावरही 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दुमदुमल्या होत्या. राज्याच्या इतिहासात कधी झाला नसेल एवढा गदारोळ 50 खोक्यांवरुन विधिमंडळाच्या पायऱ्यावर बघायला मिळाला. शिंदे गट आणि महाविकास आघाडीचे आमदार यावरुनच एकमेकांना भिडले देखील होते.