मुंबई : शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून अजित पवार गटाच्या  ( Ajit Pawar ) विरोधात कारवाईला वेग आल्यानंतर आता अजित पवार गट देखील शरद पवार गटाविरोधात आक्रमक झाला आहे. आमच्या विरोधात याचिका दाखल केल्या म्हणून आम्ही देखील शरद पवार गटातील आमदारांच्या विरोधात याचिका दाखल केल्या अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.


शरद पवार गटाच्या वतीने 15 दिवसांपूर्वी अजित पवार गटातील विधानसभेचे आणि विधानपरिषदेच्या आमदारांच्या विरोधात अपात्रतेच्या कारवाई संदर्भात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर अजित पवार गट देखील शरद पवार गटाच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.


शरद पवार गटातील 10 आमदारांच्या विरोधात याचिका 


अजित पवार गटाच्या वतीने गुरुवारी विधिमंडळात शरद पवार गटातील दहा विधानसभेच्या आमदारांविरोधात आणि विधानपरिषदेच्या दोन आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करणारी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली. पक्ष विरोधी कृती केल्यामुळे सदर आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आली आहे.


शरद पवारांकडील आणखी एक खासदार अजित पवारांकडे 


एकीकडे अजित पवार गटाच्या वतीने शरद पवार गटातील आमदारांविरोधात कारवाई सुरू असताना दुसरीकडे शरद पवार गटातील एका खासदाराने आणि एका आमदाराने अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता शरद पवार गटांमध्ये दहा विधानसभेचे आमदार आणि लोकसभेची एकूण तीन खासदार शिल्लक राहिले आहेत.


आमदारांना ब्लॅकमेल करणे सुरू असल्याचा आरोप


आमदार आणि खासदारांच्या अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याच्या निर्णयानंतर रोहित पवारांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली. आमदारांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार होत असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. जाणीवपूर्वक आमदारांची विकास काम अडवून त्यांना आपल्यासोबत घेण्याचे काम सुरू असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.


एकंदरीत राज्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रावादी प्रकार पाहिला मिळत असताना विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे. कारण नुकतच शिवसेनेच्या सुनावणी प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.


शरद पवार गटातील आमदार


1) जयंत पाटील
2) जितेंद्र आव्हाड
3) रोहित पवार
4) सुमन पाटील
5) अशोक पवार
6) सुनील भुसारा
7) प्राजक्त तनपुरे
8) बाळासाहेब पाटील
9) अनिल देशमुख
10) राजेश टोपे 
11) संदीप क्षीरसागर 


तटस्थ


1) नवाब मलिक


संबंधित बातमी :