Maharashtra Satara News : सातारा जिल्ह्यातल्या कांदाटकी खोऱ्यातल्या जीवघेण्या प्रवासाची बातमी एबीपी माझानं दाखवली आणि या मुलांच्या समस्येची दखल सरकारनं घेतली. जंगल आणि अथांग जलसागरातून शिक्षणासाठी जीवावर उदार होऊन प्रवास करणाऱ्या या विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलीय. या गावचा पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. पण विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिकक्षकांनीच त्यांना धमकावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
सातारा जिल्ह्यातील कांदाटकी खोऱ्यातील कोयना धरणांतर्गत असलेल्या शेलटी गावातील विद्यार्थांचा शिक्षणासाठीचा जिवघेवा संघर्ष कसा आहे, हे एबीपी माझानं दाखवल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. मात्र 'एबीपी माझा'ला तुम्ही हा सर्व संघर्ष का सांगितला? ते आले तेव्हा आम्हाला का कळवलं नाही? आजपर्यंत तुमची मुलं जशी शिकली तशीच तुमचीही मुल शिकवा, असं म्हणत झोरे कुटुंबाला शिक्षकांनीच धमकावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एवढंच नव्हे तर, शिक्षणाधिकाऱ्यांनीही एक प्रसिद्धी पत्रक काढून या कुटुंबाचे चक्क पुनर्वसनच झाल्याचा दाखला दिला आहे. यामुळे झोरे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
विद्यार्थांचा जिवघेणा बोटीतील प्रवास, लाईट विना जगणारं कुटंब, डोळ्यांत सतत दिसणारं पाणी, मात्र पाण्यासाठी नदीवर हंडे घेऊन पायपीट करून पाण्याची तहाण भागवणं, असा या कुटुंबाचा संघर्ष. या कुटुंबाच्या समस्या सोडवण्यापेक्षा शिक्षणाधिकाऱ्यांनी आणि शिक्षकांनी या कुटुंबाची कुचेष्टाच करुन कुंटुंबालाच धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. या कुटुंबाला शिक्षकांनी दमबाजी केल्यानंतर एबीपी माझाची टीम पुन्हा या शेलटी गावात पोहचली. त्या कुटुंबाशी संवाद साधला.
पाहा व्हिडीओ : शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास, 2022 मध्ये शिक्षणासाठी संघर्ष
जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्य कुटुंबाला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता श्रमिक मुक्तीदलाचे नेते भारत पाटणकर यांनीही शिक्षणाधिकाऱ्यांबाबत आणि धमकी देणाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, याबाबात भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे.
गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
एबीपी माझानं सातारा जिल्ह्यातील कांदाटकी खोऱ्यातील विद्यार्थांचा भयावह बोटीतला प्रवासाचा खास रिपोर्ट मधून दाखवल्यानंतर आता राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दखल घेत या विद्यार्थांच्या गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात आपण लवकरच बैठक लावू असं सांगितलं.