Maharashtra Nursing: महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने (Maharashtra Nursing Council) नोंदणीकृत केलेल्या नर्सेसमध्ये (Nurses) बोगस नर्सेसचाही समावेश असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मागील चार वर्षात कोणत्याही कागदपत्रांच्या तपासणीशिवाय, सुमारे 37 हजार नर्सेसची नोंदणी करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. राज्य सरकारने आता या नर्सेसच्या पात्रतेची चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या नर्सेसने कोरोना काळात आपले कर्तव्य बजावले आहे.  आता गरज संपल्यानंतर नोकरीवरून कमी करण्यासाठीचा हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होऊ लागला आहे. 


कागदपत्रांशिवाय, नोंदणी झालेल्या नर्सेस या राज्यासह देशभरात आणि परदेशात नोकरी करत आहेत. नर्सेसच्या या नोंदणीबाबत राज्य सरकारला एक गोपनीय अहवाल सादर करण्यात आला असून पोलिसांमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली असल्याचे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारींनुसार, या नर्सेसच्या पदविका, उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अथवा गुणपत्रिका आदी कशाचीही पडताळणी करण्यात आली नव्हती. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने  2016 मध्ये ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली होती. उमेदवाराचे नाव यादीत असून त्यांच्या नावासमोर  कोणती कागदपत्रे सादर केली, पडताळणी केली, याची माहिती नमूद करण्यात आली नाही. 


कोणताही कागदपत्रे न तपासता राज्यात जवळपास 37 हजार नर्सेसची नोंदणी केल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या प्रभारी कुलसचिव रिचेल जॉर्ज यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे 'टाइम्स ऑफ इंडिया'ने वृत्तात म्हटले आहे. कोरोना काळात कौन्सिलच्या कार्यालयात या नर्सेसना येणे शक्य नव्हते. त्यामुळे वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार, त्यांची नोंदणी केली असल्याचे जॉर्ज यांनी सांगितले. नोंदणी केली नसती तर संबंधित परिचारिकांचे एक वर्ष वाया गेले असते, असेही त्यांनी म्हटले. महाराष्ट्र राज्य पॅरामेडिकल अँड नर्सिंग एज्युकेशन बोर्डाच्या एका महिला अधिकाऱ्याचा फोन आल्याचा दावाही जॉर्ज यांनी केला असून आपण फक्त सूचनांचे पालन केले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणीच्या चौकशीसाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटले.


गरज सरो अन्....


नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ऑनलाइन गुणपत्रिकेच्या आधारावर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने या नव्या नर्सेसची नोंदणी केली होती. राज्यात कोरोना महासाथीच्या काळात आरोग्य सेवेत या नर्सेसची मोठी मदत झाली होती. आता कोरोना संकट टळल्यानंतर या सगळ्याच 37 हजार नर्सेसना बोगस ठरवणे चुकीचे असल्याची चर्चा सुरू झाली आहे.


महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल म्हणजे काय?


महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ही वैद्यकीय शिक्षण विभागातंर्गत असलेली स्वायत्त संस्था आहे. नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नर्सिंग कौन्सिकडे नोंदणी करावी लागते.  नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना परिचारिका म्हणून काम करता येत नाही. नर्सिंगचा अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कौन्सिलच्या कार्यालयात गुणपत्रिका आणि इतर कागदपत्रे सादर करावी लागतात. कोरोना काळात छापील गुणपत्रिका देण्यात आली नव्हती.