Marathwada Rain Update: कधीकाळी दुष्काळवाडा, टँकरवाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात यंदा पाऊस मनसोक्त बरसला. यावर्षी एवढा पाऊस (Rain) झाला की, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर-सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने तर अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यामुळे याचा परिणाम असा झाला की, मराठवाड्याची भूजल पातळीत (Marathwada Ground Water Level) 2 मीटरने वाढली आहे. त्यामुळे यंदा मराठवाड्यातील पाणी प्रश्न मिटला असून, विभाग टँकरमुक्त राहणार आहे.
गेली तीन वर्ष मराठवाड्यात सतत अतिवृष्टी (Heavy Rain) पाहायला मिळत असताना, यंदाही जोरदार पावसाने हजेरी लावली. विभागात पडलेल्या दमदार पावसामुळे लघु, मध्यम आणि मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मराठवाडा विभागाची आता भूजल पातळी देखील वाढली आहे. सप्टेंबरअखेर झालेल्या सर्वेक्षणात विभागाच्या भूजल पातळीत सरासरी 2 मीटरची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक 3.22 मीटरची वाढ ही परभणीत जिल्ह्यात झाली आहे.
जिल्हानिहाय आकडेवारी...
अ.क्र. | जिल्हा | वाढलेली पातळी |
1 | औरंगाबाद | 1.60 |
2 | जालना | 1.18 |
3 | परभणी | 3.22 |
4 | हिंगोली | 0.75 |
5 | नांदेड | 2.17 |
6 | लातूर | 1.35 |
7 | उस्मानाबाद | 1.69 |
8 | बीड | 1.62 |
टँकरमुक्त मराठवाडा...
मराठवाड्यात नेहमीच पाणी टंचाई पाहायला मिळते. मात्र गेल्या तीन वर्षात परिस्थिती बदलताना पाहायला मिळाली. असे असताना देखील मे महिन्यात मराठवाड्यात 59 टँकरने विविध गाव,तांडे आणि वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात होता. पण आता मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भूजल पातळीत वाढ झाली असल्याने पाणी प्रश्न मिटला आहे. त्यामुळे यंदा मराठवाडा टँकरमुक्त पाहायला मिळणार आहे.