Ratnagiri : कोकणातील रिफायनरीला शिवसेनेचा पाठिंबा की विरोध? यावर चर्चा अजूनही सुरूच आहेत. त्याला कारण आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेलं पत्र. या पत्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी राजापूर तालुक्यातील बारसू गाव आणि आसपासची जवळपास 13 हजार एकर जागा देण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. पण, त्यानंतर देखील शिवसेनेची भूमिका स्थानिकांबरोबर राहण्याची असल्याचं सेनेच्याच नेत्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, रिफायनरीबाबत ठोस भूमिका घेण्यास शिवसेनेची गोची होत नाही ना? असा सवाल विचारला जात आहे. कारण शिवसेनेचे स्थानिक आमदार राजन साळवी यांनी 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं याचा अर्थ स्पष्ट आहे.' शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभं राहण्याचं आवाहन केलं होतं. पण, रिफायनरीबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका काय? असा सवाल विचारल्यानंतर मात्र परिवहन मंत्री आणि उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या अनिल परब यांनी मात्र 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिफायनरीबाबत पत्र लिहिणे हा शासकीय भाग आहे. स्थानिकांना विश्वासात घेत, त्यांचे म्हणणे ऐकून घेत रिफायनरीबाबत निर्णय घेतला जाईल' अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्य बाब म्हणजे अनिल परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. रत्नागिरी येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी रिफायनरीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. त्यामुळे शिवसेनेची भूमिका नेमकी काय? याबाबत चर्चा रंगली आहे. शिवसेना एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शविते. त्याचवेळी शिवसेनेचे नेते स्थानिकांचे ऐकून घेऊ असं म्हणतात. तर, स्थानिक आमदार शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचं आवाहन करतात. परिणामी शिवसेनेच्या भूमिकेबाबत मात्र सध्या अनेक सवाल विचारले जात आहेत.
सध्या रिफायनरीबाबत काय सुरू ?
रिफायनरी येणाऱ्या भागात परप्रांतियांनी हजारो एकर जमीन खरेदी केल्याची धक्कादायक बाब 'एबीपी माझा'नं यापूर्वीच समोर आणली आहे. जानेवारी 2019 ते मार्च 2022 या कालावधीत झालेली जमीन खरेदीमध्ये जम्मू - काश्मीर, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटकसह राज्यातील विविध भागांतील लोकांनी जमीन खरेदी केली आहे. स्थानिकांनी मात्र आमचा विश्वासघात करत जमीन खरेदी केल्याचं 'एबीपी माझा'शी बोलताना म्हटलं आहे. त्यामुळे स्थानिकांना काहीही न कळता या साऱ्या गोष्टी कोण हाताळत आहे? याबाबत प्रश्न विचारले जात आहेत.
रिफायनरीला समर्थन की विरोध ?
रिफायनरीबाबत समर्थक असतील किंवा विरोधक अजूनही शक्तीप्रदर्शन करत आहेत. पण, विरोधकांनी 6 मार्च रोजी काढलेल्या मोर्चाला मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. तर, धोपेश्वर ग्रामपंचायतीमध्ये झालेला रिफायनरीबाबतचा ठराव देखील लक्षणीयरित्या बहुमत मिळवत विरोधात गेला होता. परिणामी रिफायनरीला असलेला विरोध अधिकपणे दिसून आला आहे.
रिफायनरी आल्यास काय फायदा ?
कोकणात रिफायनरी आल्यास काय फायदा? असा प्रश्न देखील विचारला जात आहे. याबाबत बोलताना समर्थक असतील किंवा कंपनीची माणसं यांच्याकडून जवळपास 3 लाख कोटीची गुंतवणूक आल्यास कोकणच्या विकासाला चालना मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोकणासह देशाच्या आणि राज्याच्या जीडीपीमध्ये वाढ होणार असून लाखो स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. रिफायनरी आल्यास विकासासाठी मोठा हातभार लागणार असून कोकणच्या पर्यटनाला काहीही धक्का लागणार नसल्याचा दावा देखील कंपनी आणि रिफायनरी समर्थकांकडून केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या :