ENBA Awards : ENBA पुरस्कार सोहळ्यात एबीपी न्यूज आणि एबीपी माझाचा डंका पाहायला मिळाला. एबीपी माझाच्या बाप्पा माझा कार्यक्रमाचा सुवर्णपदकाने गौरव करण्यात आला आहे. तर मन सुद्ध तुझं या विशेष कार्यक्रमाला कांस्य पदक मिळालं आहे. कोविड चाचणी दरम्यान खोट्या अहवाला संदर्भातील विशेष रिपोर्टचा या सोहळ्यात सुवर्णपदकाने सन्मान करण्यात आला आहे. या मानाच्या पुरस्कार सोहळ्यात अविनाश पांडे यांना बेस्ट सीईओ या पुरस्काराने गौरवण्यात आलं. एबीपी न्यूजच्या मास्टर स्ट्रोक या कार्यक्रमाला बेस्ट करंट अफेअर्स विभागात पुरस्कार प्राप्त झाला आहे.
एबीपी माझाला यात तीन पुरस्कार मिळाले आहेत. यात माझ्या बाप्पा माझाला सुवर्ण पदक मिळालं आहे. गणपती बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत पर्यावरणपूरक गणेशउत्सवासंदर्भात विशेष कव्हरेज याअंतर्गत देण्यात आलं होतं.
तर मन सुद्ध तुझं या मालिकेला कांस्य पदक मिळाले आहे. मानसिक आरोग्याविषयक गोष्टी अगदी सोप्या पद्धतीनं सांगणारी ही मालिका कोरोना काळात चांगलीच पसंतीस उतरली होती.
तर ENBA पुरस्कार सोहळ्यात एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावलेंचा गौरव करण्यात आला आहे. कोविड चाचणीचा घोटाळा बाहेर काढणाऱ्या स्पेशल स्टोरीची दखल घेतली आहे. नवी मुंबईतील कोविड टेस्टिंग घोटाळ्याची ही बातमी होती. काँटॅक्ट ट्रेसिंगचा आकडा वाढवण्यासाठी टेस्टिंगसाठी आलेल्या रुग्णांच्या रिपोर्ट्स सोबत त्यांच्या नातेवाईकांचे देखील रिपोर्ट बनविण्यात आल्याचं समोरं आणलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये 10 वर्षांपूर्वी मेलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे देखील रिपोर्ट बनवल्याचं एबीपी माझाने उघड केलं होतं. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारनं घेतली होती. याबाबतच्या एबीपी माझाच्या विशेष रिपोर्टला यंदाचा ईएनबीएचा पुरस्कार मिळाला आहे.
अविनाश पांडे यांना 'बेस्ट सीईओ' पुरस्कार
एबीपी न्यूजचे सीईओ अविनाश पांडे यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्यात 'बेस्ट सीईओ' पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर मास्टर स्ट्रोकला 'बेस्ट करंट अफेअर्स'चा पुरस्कार मिळाला आहे. नरसिंह यांना बेस्ट बिजनेस प्रोग्राम पुरस्कार मिळाला आहे, तर एबीपी न्यूजच्या 'विश्व विजेता' या कार्यक्रमाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय कव्हरेजचा पुरस्कार मिळाला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपली पकड मजबूत करणाऱ्या एबीपीच्या 'अनकट'ला सर्वोत्कृष्ट चालू घडामोडी कार्यक्रम हिंदीसाठी सुवर्णपदक मिळाले आहे. 'भारत का युग'ला सर्वोत्कृष्ट बातम्या कव्हरेजसाठी पुरस्कार मिळाला आहे.