Rajya Sabha Election : महाराष्ट्रातील राज्यसभेसाठीच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता अनेक इच्छुकांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. माजी मंत्री संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश करावा यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या बंजारा समाजातील महंतांना राज्यसभेवर पाठवण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी महंतांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर चर्चा सुरू करण्यात आली आहे. 


पुढील महिन्यात राज्यसभेच्या सहा जागांवर निवडणूक होणार आहे. सध्याच्या संख्याबळानुसार, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येकी एक आणि भाजपचे दोन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. मात्र, सहाव्या जागेवरुन चुरस वाढली आहे. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेदेखील सहावी जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे  आता सहाव्या जागेसाठीची चुरस वाढली आहे. 


माजी मंत्री संजय राठोड यांना कॅबिनेटमध्ये पुन्हा स्थान मिळावे यासाठी बंजारा समाजाचे महंत प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे गोर बंजारा समाजाने महंतासाठी लॉबिंग आणि मागणी सुरू केली आहे. 


 काँग्रेसने महाराष्ट्रातील राज्यसभेची जागा ही पी. चिदंबरमच्या ऐवजी 12 कोटी लोक संख्या असणाऱ्या गोर बंजारा समाजातील व्यक्तीला देण्याची मागणी सुरू आहे. पोहरदेवीचे महंत सुनील महाराज असावी अशी मागणी करण्यात येत असून त्या अनुषंगाने भेटीगाठी आणि व्हाट्सअॅप्प मेसेज सुरू झाले आहे. 


गोर बंजारा समाज हा कसा काँग्रेसचा पारंपरिक मतदाता होता आणि कशी बंजारा असणाऱ्या वसंतराव नाईक यांनी काँग्रेस वाढवली याची एक मोठी मांडणी केली जात आहे. काँग्रेसने त्यांच्यानंतर पुढे समाजाला प्रतिनिधीत्व दिले नाही. म्हणून आता हा मतदार शिवसेना, राष्ट्रवादीकडे विखुरला असल्याचे सांगण्यात येत आहे.


उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथे भाजपने योगी, महंत यांना राज्य सभेवर, विधान सभेवर पाठवले, आता तेच काँग्रेसने ही करावे असे म्हटले आहे. तसेच महंत सुनील महाराज यांनी अनेकदा नाना पाटोलेंची भेट घेतली असून त्यांना ह्या समाजाच्या भावना आहेत असे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.