Rajesh Tope on Corona : महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. काय म्हणाले राजेश टोपे?


परीक्षा नव्या पद्धतीने घेण्याची सरकारची भूमिका


आरोग्य विभागाच्या पेपरफुटी नंतर भरती प्रक्रियेसाठी नव्या पद्धतीने परीक्षा घेण्याचा सरकारचा निर्णय आहे, यावर पोलिसांचा स्पष्ट अहवाल आल्यानंतर त्यावर त्वरित निर्णय घेतला जाणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते. पोलिसांचा रिपोर्ट आल्यावरच या संदर्भात निर्णय होणार असे आरोग्यमंत्री म्हणाले.


पोलिसांनी स्पष्ट अहवाल देण्यासाठी गृहमंत्र्यांना विनंती


दरम्यान पोलिसांचा अहवाल लवकर यावा यासाठी गृहमंत्री व पुणे पोलीस आयुक्तांना याबाबत सांगितल्याचे देखील आरोग्यमंत्री म्हणालेत. पोलिसांनी स्पष्ट अहवाल देण्यासाठी गृहमंत्र्यांना विनंती करण्यात आल्याचं टोपे यावेळी म्हणाले.


पुणे पोलीसांच्या तपासाला वेग


24 ऑक्टोबर 2021 रोजी झालेला आरोग्य विभागाचा गट क चा पेपरही फुटला होता. यामध्ये न्यासा कंपनीचे अधिकारी सहभागी होते अशी माहिती पोलीस तपासात समोर आली होती. गट 'ड' चा पेपर न्यासाचे अधिकारी आणि बोटले आणि बडगिरे अशा दोन व्यक्तींच्या माध्यमातून फुटला होता. दोघे एकमेकांशी संबंधित होते का याचा तपास सुरू आहे. गट 'क' चा पेपर फोडण्यात न्यासाच्या अधिकाऱ्यांसोबत  सहभागी असलेल्या दोन दलालांना याआधीच  अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली असून आरोग्य विभागाचा हा पेपर फुटल्यानंतर तो राज्यातील अनेक ठिकाणी विकण्यात आला होता.  त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे राज्याच्या इतरही भागातून आणखी काही जणांना या प्रकरणात अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ए. बी. पी. माझाने पेपर फुटीचा हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पुणे पोलीसांच्या तपासाला वेग आला.



मार्चमध्ये निर्बंधापासून मुक्ती मिळेल?
कोरोना पार्श्वभूमीवर केंद्राच्या सुचनेनंतर निर्बंध कमी करण्यावर भर दिला जात आहे.दरम्यान राज्यात मार्चमध्ये मास्क मुक्ती होणार नाही, मात्र निर्बंधापासून मुक्ती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत निर्बंध मुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांना देखील विनंती करू असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मार्च महिन्यात पूर्णपणे अनलॉक होण्याचे संकेत टोपे यांनी दिले आहेत. "येत्या मार्च महिन्यात राज्यातील निर्बंध शिथिल केले जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीसुद्धा हीच मनीषा असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे.  


कोरोना रुग्णांच्या संख्येत घट


महाराष्ट्राचा विचार केला तर तिथेही रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्यामध्ये घसरण पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूरसह मोठ्या शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे. काही जिल्ह्यात रविवारी एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 1 हजार 437 नवे रुग्ण आढळले आहेत. शनिवारी राज्यात एक हजार 635 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात कोरोना महामारीची तिसरी लाट ओसरली आहे. कारण मुंबई, पुणे जिल्हा, पुणे मनपा आणि अहमदनगर वगळता कोणत्याही जिल्ह्यात तीन आकडी रुग्णसंख्या नाही. 


 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha