मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांच्यासह सभेच्या आयोजकांविरोधातही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राज ठाकरेंवर भारतीय दंड संहितेतील कलम (IPC) 116, 117, 153 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असले तरी राज ठाकरे यांना अटक झाली तर पोलीस स्थानकात जामीन मंजूर होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्यावर ज्या 153 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र चिथावणी दिल्यानंतर दोन समूहात हिंसाचार झाली नाही त्यामुळे हा गुन्हा सध्या जामीनपात्र आहे.
कलम 153 आणि 153 अ मधील फरक काय?
कलम 153
भारतीय दंड संहितेतील कलम 153 म्हणजे दोन समूहात भांडण लावणे. या कलमानुसार जर चिथावणीखोर वक्तव्यानंतर दोन समूहात भांडणं नाही झाली तरी सहा महिन्याचा कारावास किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही होऊ शकतो. जर दोन समूहात भांडणं झाल्यास चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला 1 वर्षाचा कारावास किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही होऊ शकतो. मात्र या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्यास पोलीस स्थानकात जामीन मंजूर होऊ शकतो.
153 अ
भारतीय दंड संहितेतील कलम 153 अ म्हणजे दोन समूहात किंवा धर्मात भांडण लावण्यासाठी कृत्ये करणे. या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्यास तीन वर्षापर्यंत शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतो. मात्र यामध्ये आरोपीला अटक झाल्यास न्यायलयातून जामीन मिळवावा लागतो. 153 अ हे कलम 153 पेक्षा कठोर आहे.
दुसरीकडे पोलीस राज ठाकरे यांना कलम 149 अंतर्गत नोटीस देण्यासाठी राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहचण्याची शक्यता आहे. 1 तारखेला राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा झाली होती. या सभेतल्या वक्तव्याप्रकरणी राज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी आणि अटीशर्तींचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.