Loudspeaker Controversy : मनसे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये (Aurangabad) जाहीर सभा घेतली होती. या सभेला अटी शर्तींसह परवानगी दिली होती. मात्र या सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला. औरंगाबादच्या सभेत त्यांनी मशिदींसमोरील भोंगा हटवला नाही तर दुप्पट आवाजानं हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. त्यासाठी 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. आता याप्रकरणी पोलीस पुढे काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. मनसेच्या या जाहीर सभेसाठी पोलिसांकडून अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली होती. परंतु, राज ठाकरेंनी सभेत अनेक अटींचं उल्लंघन आल्याचं समोर आलं होतं. सभेनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विविध स्तरांतून होत होती. अशातच औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकून राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा घेतला. त्यानंतरच औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रस्त्यावर उतरुन नागरिकांना त्रास होईल असं कृत्य करु नका : शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री
राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मनसेला शांततेचं आवाहन करत कायदा हातात न घेऊ नये असं म्हटलं आहे. अटी-शर्तींसह औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी मनसेच्या सभेला परवानगी दिली होती. या सभेदरम्यान अटी-शर्तींचं उल्लंघन झालं असेल तर आयुक्तांनी त्यांचा अधिकार वापरुन कारवाई केली असेल. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. हे कायद्याचं राज्य आहे. कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरायचं हे चालणार नाही. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस सज्ज आहेत. मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, कायद्याला कायद्याने काम करु द्या, पोलिसांना त्यांचं काम करु द्या. कारवाई योग्य वाटत नसेल तर न्यायालय आहे, तिथे न्याय मागा. पण रस्त्यावर उतरुन सामान्य नागरिकांना त्रास होईल असं कृत्य करु नये, असं शंभूराज देसाई म्हणाले.
पाहा व्हिडीओ : जेव्हा राज ठाकरे यांना रात्री 2:45 वाजता अटक झाली होती
मनसेच्या नेत्यांना पोलिसांकडून नोटीस
राज ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेनंतर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत. राज ठाकरे यांच्या सभेनंतर दोन समाजात तेढ निर्माण होण्याची पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आपण तेढ निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करु नये म्हणून पोलिसांनी नोटीस पाठवल्या आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनाही पोलिसांना नोटीस पाठवल्या आहेत.
CRPF च्या 87 कंपन्या, 30 हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात
"कोणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेतल्यास कारवाई केली जाईल. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवू नका, असं आवाहन पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी केलं आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते म्हणाले की,"कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस दल सज्ज आहे. सीआरपीएफच्या 87 कंपनी आणि 30 हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर आहेत."