Maharashtra Rains : सध्या राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात चांगलाच पाऊस झाला. जूनमध्ये उघडीप दिलेल्या पावसाचा जुलैमध्ये जोर वाढल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई बरोबरच कोकणात देखील पावसाचा जोर वाढला आहे. सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. यामुळं वाहतुकीसाठी महामार्ग बंद करण्यात आला आहे.
4 जुलै पावसाचा जोर वाढणार
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच राज्याच्या इतर भागात चांगला पाऊस झाला. दरम्यान, 4 जुलै म्हणजे सोमवारपासून कोकणसह राज्याच्या अंतर्गत भागात आणि विदर्भाच्या काही भागात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुसळधार पावसाचा इशारे कोकणासह विदर्भात देण्यात आला आहे. दरम्यान, धुळे, जळगाव, पालघर या जिल्ह्यात पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.
बुलढाणा जिल्ह्यात पावसाची हजेरी
गेल्या चार दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यात आज पुन्हा आगमन केलं आहे. जिल्ह्यातील लोणार, मेहकर, सिंदखेडराजा परिसरात दुपारपासून जोरदार पावसानं आगमन केलं आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात अजूनही खरीप पेरणी मोठ्या प्रमाणात सुरु असून या पावसानं मात्र शेतकरी आनंदात असल्याचं चित्र आहे.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. या महामार्गावरील परशुराम घाटात दरड खाली आहे. यामुळे वाहतूकीसाठी महामार्ग बंद करण्यात आली आहे. सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली आहे. यामुळं वाहतुकीसाठी महामार्ग बंद करण्यात आला आहे. घटनास्थळी संबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी पोहचले आहेत. पर्यायी वाहतूक लोटे चिरणी कळबस्ते मार्गे वळवण्यात आली आहे. तर महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.