मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
आरे बचावासाठी आज पर्यावरणवाद्यांचं सकाळी 11 वाजता आंदोलन
ज्यात सत्तांतर होताच मुंबईतल्या मेट्रोची कारशेड पुन्हा आरेमध्ये करण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतलाय. नव्या सरकारच्या या निर्णयाविरोधात पर्यावरणवाद्यांनी उद्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उद्या सकाळी 11 वाजता आरे परिसरात पर्यावरणवादी एकत्र येणार आहेत. कारशेड पुन्हा आरेमध्ये आणल्यास आम्ही पुन्हा येऊचे पोस्टर्स व्हायरल करण्यात आलेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
विधानसभा अध्यक्षांची निवड आज होणार
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आज बोलावलेल्या विधानसभेच्या दोन दिवसांच्या विशेष सत्रामध्ये अध्यक्षांची निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तर भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या नावाची या आधीच घोषणा झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपनं राहुल नार्वेकरांना संधी दिली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरलेला नव्हता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा अर्धा तास उरला असताना महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत अखेर राजन साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.
अधिवेशनाचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
- सकाळी 11 वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.
- मंत्र्यांचा परिचय.
- नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय.
- अध्यक्षांच्या निवडीबाबत राज्यपालांचा संदेश.
- अध्यक्षांच्या निवडीच्या कार्यक्रमाची घोषणा.
- भाजपचे चंद्रकांत पाटील हे राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडतील. गिरीश महाजन अनुमोदन देतील.
- चेतन तुपे हे राजन साळवींच्या नावाचा प्रस्ताव मांडतील. संग्राम थोपटे अनुमोदन देतील.
- अध्यक्षांची निवड
शिवसेना आमदारांना व्हीप जारी
आज शिवसेना आणि बंडखोर आमदार आमनेसामने येणार आहेत. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी सुनील प्रभूंनी शिवसेना आमदारांना व्हीप जारी केलाय. हा व्हिप उद्धव गटासह शिंदे गटातील आमदारांनाही लागू आहे. मात्र, हा व्हिप आम्हाला लागू होत नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यपालांविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्ताकारणामध्ये घेतलेल्या भूमिकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. विधानभवन परिसरातील गांधी पुतळा या ठिकाणी सकाळी 10 वाजता हे आंदोलन होणार आहे.
उपराष्ट्रपतीपदासाठी कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. कॅप्टन यांनी आपला पक्ष पंजाब लोक काँग्रेस भाजपमध्ये विलीन करण्याची तयारी केल्यानंतर ही चर्चा अधिक तीव्र झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी कॅप्टन यांचे चांगले संबंध आहेत. पक्षाच्या विलीनीकरणामुळे त्यांची उमेदवारी जाहीर होऊ शकते, असे बोलले जात आहे.
पुढील 48 तास कोकण आणि मराठवाड्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता
आज कोकण किनारपट्टी आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे. सोमवारपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, विदर्भाच्या काही भागात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणात 4 आणि 5 तारखेला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भाजप राष्ट्रीय कार्यकारणीचा दुसरा दिवस
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक हैदराबादमध्ये सुरू आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबादमधील जनसभेला संबोधित करणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी 4.30 या वेळेत मोदी कार्यकारणीला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता मोदींची सभा होणार आहे.
वारी अपडेट
ज्ञानेश्वरांची पालखी फलटणहून निघेल आणि बरडला मुक्कामी थांबणार आहे. तुकोबांची पालखी इंदापूरला मुक्कामी राहील.