Maharashtra Rains : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच शेतीचही मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, मुंबई (Mumbai) आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तसेच पुणे (Pune), सोलापूर (Solapur), परभणी (Parbhani) जिल्ह्यातही  पावसानं हजेरी लावली. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी देखील पाऊस झाला आहे. दरम्यान, आजही राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 


मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आल्यानं नागरिकांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. जवळपास आठ लाख हेक्टरहून अधिक शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. या नुकसानीचे ध्या पंचनामे सुरु असून, शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली आहे.


परभणीत पहाटेपासून जोरदार पाऊस


दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर परभणी जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. विजांचा गडगडाटासह या सुरु असलेल्या या पावसामुळं छोट्या-मोठ्या नाल्यांना पाणी आले आहे. तसेच प्रकल्पातील पाणी साठ्यातही मोठी वाढ झाली आहे. उघडीप देऊन पाऊस पडत असल्यानं यंदा जिल्ह्यातील पीक परिस्थिती जोमात आहे.


नागपूर पाऊस


यावर्षी मान्सूनचे उशीरा आमगन झाले असले तरी, पावसाळ्याच्या दोन महिन्यात आतापर्यंत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी जुलै महिन्यात सर्वाधिकवेळा अतिवृष्टीची नोंद हवामान खात्याने घेतली आहे. मागील 10 वर्षांच्या मान्सूनच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास जुलै अखेरपर्यंत साधारणः 400 मिमी पावसाची नोंद केली जाते. यंदा मात्र पावसाने चांगलाच जोर धरला. नागपूर शहरात आतापर्यंत 746.9 मिली मीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. एवढाच पाऊस जिल्ह्यातही नोंदविण्यात आला आहे. जो सरासरी जून-जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाच्या 300 मिमी अधिक आहे. जून महिन्याच्या अखेरीस 119 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर जुलै या एकाच महिन्यात 627 मिमी  पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे.


नंदूरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस


नंदूरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. नवापूर तालुक्यातील निमदर्डा गावाजवळ नागन नदीवर पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळं पर्यायी पूल बनवण्यात आला होता. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी नागन नदीला आलेल्या पुरात हा पर्यायी पूल वाहून गेला होता. त्यानंतर संपर्क तुटलेल्या दहा गावांचा संपर्क करण्यासाठी पुन्हा पर्यायी पूल बनवण्यात आला होता. मात्र नागन नदीच्या पाणी पातळीत पुन्हा अचानक वाढ झाल्यानं नवीन बनवण्यात आलेला पूल दुशऱ्यांदा वाहून गेला आहे. त्यामुळं परिसरातील दहा गावांचा संपर्क तुटला आहे.