Maharashtra Rain : राज्यात परतीच्या पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. हवामान विभागनं (meteorological department) दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. रात्रभर मुंबईत जोरदार पाऊस सुरु होता. या पावसामुळं अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच राज्यातील कोल्हापूर, पुणे, सोलापूर, हिंगोली, वाशिम, पालघर, यवतमाळ, लातूर या जिल्ह्यांना देखील पावसानं झोडपून काढलं आहे. दरम्यान आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज संपूर्ण राज्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. येत्या चार ते पाच दिवसात राज्यात गडगडाटासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
मुंबई पावसाची जोरदार हजेरी, सखल भागात पाणी
मुंबई आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. रात्रभर देखील पावसानं जोरदार हजेरी लावली, पुन्हा सकाळपासून पाऊस सुरु आहे. मुंबईसह, ठाणे, डोंबिवली आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला. मुंबईतील हिंदमाता परिसरात पावसामुळं सखर भागात पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच अंधेरी सबवे वर 2 फुटापर्यंत पाणी साचल्याने वाहतुकीची गती मंदावली आहे. सिरी रोड पेट्रोल पंपाजवळ वाळकेश्वर रस्त्यावर 1.05 फूट पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे.दरम्यान, आज मुंबईमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढचे काही दिवस पावसाच्या मध्यम किंवा हलक्या सरी बरसणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी
कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसानं आठवडाभरात दुसऱ्यांदा हाहाकार केला आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. या पावसाने अनेक ठिकाणी दाणादाण झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीन आणि भात कापणीला वेग आला असतानाच परतीचा पाऊस दणका देत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. जयसिंगपूर, इचलकरंजी तसेच असळज-गगनबावडा भागामध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. कुंभी नदीवरील रेव्याचीवाडी, कातळी बंधारे पाण्याखाली गेले आहे.
परतीच्या पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढली, शेती पिकांना फटका
राज्यातील विविध जिल्ह्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. विजांच्या कडकडाटसह पावसानं हजेरी लावली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे, शेती पिकांचं मोठं नुकासन झालं आहे. सोयाबीन आणि कापसाला मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी सोयाबीनची काढणी झाली होती, तर काही ठिकाणी सोयाबीन काढायचे बाकी होते, अशा स्थितीत पाऊस आल्याने शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
यवतमाळ जिल्ह्यातील यमरखेड, महागाव, आर्णी, पुसद आणि दारव्हा या भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळल्यानं काढणीला आलेलं सोयाबीन आणि वेचणीच्या तोंडावर असलेल्या कापूस पिकांचं मोठं नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी शेतात सोंगणी करुन ठेवलेले सोयाबीन पाण्यात सापडलं आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. जिह्यात सर्वाधिक पाऊस पुसद तालुक्यात झाला आहे. पालघर जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने हळव्या भात पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पालघर जिल्ह्यात पिकून आलेलं हळवे भात पीक अचानक पावसामुळे पूर्णपणे आडवं झालं आहे. यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. डहाणू वाडा विक्रमगड जव्हार भागातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. पालघर जिल्ह्यात सुमारे 75 हजार हेक्टरवर पावसाळ्यात भात शेती केली जाते. यामध्ये हळवी आणि गर्वी अशी दोन पिकं घेतली जातात. सध्या हळवी भात पूर्ण पिकून आला असतानाच जोरदार पाऊस झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यातील ढवळस (Dhavalas) परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत असून, अनेक ठिकाणची वाहतुक बंद करण्यात आली आहे. तसेच या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच करमाळा तालुक्यात देखील जोरदार पाऊस झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: