Mumbai Heavy Rainfall : मुंबई पुण्यासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने (Pune IMD) वर्तवली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळ राज्यात दोन दिवस मुसळधार (Heavy Rainfall) पाऊस कायम असणार आहे आणि त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल, असा सुद्धा अंदाज यावेळी वर्तवण्यात आलाय. मुंबईत आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता असून बुधवार पासून पावसाचा जोर कमी होईल ,असा पूर्वानुमान हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. मुंबई, कोकणला रेड अलर्ट असून पुण्यातील घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला आहे. नेमका संपूर्ण राज्यात पावसाचा इम्पॅक्ट कसा असणार आहे? याबाबत पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी अधिक माहिती दिलीय, ती जाणून घेऊ.

Continues below advertisement


मुंबईत अचानक एवढा एवढा पाऊस का पडतोय?


मध्य-पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील बहुतांश भागात पाऊस पडतो आहे. सोबतच मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. परिणामी द्रोनीय रेषा तयार झाली आहे, जी उत्तर कोकण ते केरळपर्यंत आहे. त्यामुळेच कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात आणि घाट माथ्यांवर मुसळधार तर उर्वरित राज्यात पावसाच्या सरी कोसळतांना दिसत आहेत.


आगामी दोन दिवस पावसाचे, हवामान शास्त्रज्ञांचा अंदाज काय?


आगामी दोन दिवस कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच या भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यांवर देखील रेड अलर्ट जरी करण्यात आला आहे. तर समतल भागात ऑरेंज अलर्ट असून दोन दिवसांनंतर येथे यलो अलर्ट असणार आहे. . तर आज मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट, तर उद्यापासून यलो अलर्ट असणार आहे. सोबतच विदर्भात आज ऑरेंज अलर्ट आणि उद्या यलो अलर्ट असेल. त्यानंतर मात्र पावसाचा प्रभाव कमी राहिल. अशी माहितीही त्यांनी दिली.


मुख्यमंत्र्यांकडून राज्यभरातील पूरस्थितीचा आढावा, पुढील 48 तास महत्त्वाचे!


राज्यभरात कोसळणाऱ्या पावसाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये दाखल झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील पूरस्थिती आणि पावसाचा आढावा घेतला. पुढील 48 तास महत्त्वाचे असून, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही मुसळधार पाऊस सुरूच आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये पाऊसमानाची सद्यस्थिती, ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केलेल्या ठिकाणांची माहिती घेण्यात आली. नागरिकांचे स्थलांतर कसे केले जात आहे आणि कोणत्या भागांमध्ये लोक अडकले आहेत, यावरही चर्चा झाली.


यावेळी आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत संवाद साधून उपाययोजनांवर भर देण्यात आला. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. पावसाच्या तीव्रतेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकारचे बारीक लक्ष आहे.