मुंबई : राज्यात आजही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचं चित्र आहे. येत्या दोन दिवसामध्ये पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता असून अनेक ठिकाणच्या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तर अनेक ठिकाणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील 48 तासात पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता, शाळा बंद (Pune Rain Update)
पुढील 48 तासात पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळा बंद राहणार आहेत. पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचतंय. त्यामुळे आज दुपारपासून उद्या सायंकाळपर्यंत शाळा भरणार नाहीत. प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवडमधील शाळा उद्या बंद राहणार (Pimpri Chinchwad)
पुण्यासोबतच पिंपरी चिंचवडमधील शाळा उद्याही बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या परिसरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये 48 तासात अतिवृष्टीचा इशारा (Kolhapur Satara Rain Updates)
कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात पुढील 48 तासात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मुसळधार पाऊस सुरूच असून पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. साताऱ्यामध्ये कोयनेच्या क्षेत्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अतिमुसळधार पाऊस पडलेल्या ठिकाणी शाळा बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
रायगडमध्येही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय (Raigad Rain)
गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दोन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याठिकाणी मुसळधार पाऊस असेल, तिथे शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लातूरमध्ये पावसाचा जोर वाढला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा (Latur)
लातूर जिल्ह्यात काल आणि आज दिवसभर संततधार होती. नद्या, नाल्यांना पाणी आले आहे. मांजरा नदीवरील वांगदरी, होसूर बॅरेजेस शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पाणी नदीपात्रात सोडले जाणार असून नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघू असे 148 प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांचा एकूण पाणीसाठा 332.415 दलघमी, मृतपाणीसाठा 135.732 दलघमी उपयुक्त पाणीसाठा 196.693 दलघमी आहे. उपयुक्त साठ्याची टक्केवारी 26.14 आहे. यातील काही प्रकल्पांतच हळूहळू जलसाठा वाढतोय. मांजरा प्रकल्प क्षेत्रावर 151.5 मी.मी. पाऊस झाला आहे. या पावसावरच मांजरा प्रकल्पात एक टक्क्याने पाण्याची वाढ झाली असल्याची माहिती आहे.
पूरपरिस्थितीमुळे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
गेल्या चार दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांदेड जिल्ह्यात बुधवारी सकाळी 8.20 वाजता संपलेल्या पावसानंतर, गेल्या 24 तासात सरासरी 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 510.30 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती पाहता जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील गोदावरी, आसना, मन्याड, पैनगंगा, मांजरा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर नांदेड शहराची तहान भागवणारा डॉ. शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्प 84.21 टक्के क्षमतेने भरला आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव, उमरी, मुदखेड, मुखेड, बिलोली, नांदेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर सखल भागात राहत असलेल्या नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे.
नांदेडमध्ये अनेक गावांना पुराचा वेढा, गावांचा संपर्क तुटला
गेल्या आठ दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात संतधार पाऊस बरसत असून दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे गोदावरी, पैनगंगा, मांजरा, मन्याड, सीता नदी दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान जिल्ह्यात आसना नदी परिसरातील वरील भागात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे आसना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहतेय.व त्यामुळे नांदेड शहरास जोडणारे प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने नांदेड-मालेगाव राष्ट्रीय महामार्ग, नांदेड -वसमत राज्य महामार्ग, नांदेड -पूर्णा राष्ट्रीय महामार्ग, किनवट नांदेड राष्ट्रीय महामार्ग रहदरीसाठी बंद करण्यात आले आहेत.
उजनी धरण ओव्हरफ्लो (Ujani Dam Overflow)
पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण हे काल रात्री प्लसमध्ये आले आहे. काल रात्री 9 वाजता उजनी धरण प्लसमध्ये आलं आहे. उजनी धरणाचा मृत पाणीसाठा हा 63.25 टीएमसी इतका आहे. मागच्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने उजनी धरण प्लसमध्ये आलं आहे. 7 जुलैपासून आतापर्यंत उजनी धरणात जवळपास सात टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे उजनी हे प्लसमध्ये आलं आहे. मागच्या वर्षी हे धरण 22 जुलै रोजी प्लसमध्ये आलं होतं. यंदाच्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत 9 दिवस आधीच प्लस मध्ये आलं आहे. धरणाची क्षमता ही 117 टीएमसी इतकी आहे. सध्या उजनी धरणात 3 टक्के जिवंत पाणी साठा आहे.
जायकवाडी धरणात 95 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरु; पूरपरिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून (Aurangabad Rain Update)
नाशिक जिल्ह्यातील धरणातून सुरु असलेला विसर्ग आणि धरण परिसरात होत असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात 95 हजार 556 क्युसेक पाण्याची आवक सुरु आहे. तर जायकवाडी धरण तब्बल 46 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातील जिवंत पाणीसाठा 1014.421 दलघमी आहे. तर फुटामध्ये पाणीपातळी 1510.65 फुट असून, मीटरमध्ये 460.446 मीटर आहे. तर धरण क्षेत्रात सुरु असेलला पाऊस अजूनही सुरुच आहे. या परिसरातील पूरपरिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेऊन आहे.
पालघरमध्ये मुसळधार पाऊस (Palghar Rain News)
पालघर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झाला असून त्याच्यामुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील नदी-नाले ओसांडून वहायला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे शेकडो एकर भात शेती पाण्याखाली जाताना दिसत आहे. जिल्ह्यातील झालेल्या पेरण्या आणि भात लावणीचं मोठं नुकसान झालं आहे. सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे पश्चिम किनारपट्टी भागात काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरलं आहे. तर रस्त्यांवर पाणी आल्यामुळे काही रस्ते बंद झाले आहेत.
अंबरनाथमधील बारवी धरण 50 टक्के भरलं (Ambernath)
सलग 10 व्या दिवशी अंबरनाथ तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर आता याच पावसामुळे बदलापूर शहरातील बारवी धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. बारवी धरणात आता 50 टक्के पाणी साठा तयार झाला. ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणार हे महत्त्वाचं धरण आहे. आता पर्यंत धरण परिसरात 864 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. ही जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बाब म्हणावी लागेल. बारवी धरणातून ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या महापालिका आणि त्याच बरोबर औद्योगिक क्षेत्रांना देखील पाणी पुरवठा केला जातो.
नंदुरबारमध्ये ऑरेंज अलर्ट जारी (Nandurbar)
नंदुरबार जिल्ह्यात काही भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला पावसाचा जोर वाढू शकण्याची शक्यता आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये पाऊस होत सल्याने नद्यांना पूर आला आहे. पावसामुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे यशोदा नदीला पूर आला आणि जनजीवन तर विस्कळीत झालं. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या वाहून गेल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
रत्नागिरीतील वाशिष्टी नदीच्या पाणीपातळीत वाढ (Ratnagiri)
रत्नागिरीतील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाल्याने वाशिष्टी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदी अजूनही दुथंडी भरून वाहत असून त्यामुळे चिपळून भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाशिष्टी नदी पत्रातील जुवाडा बेटावरील 13 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.