Aishwarya Jadhav : जागतिक टेनिस क्रमवारीमध्ये 14 वर्षाखालील गटात अग्रस्थानी असणारी आणि त्याच गटातून विम्बल्डनमध्ये चमकलेली कोल्हापूरची टेनिस क्वीन ऐश्वर्या जाधव आज लंडनहून कोल्हापूरमध्ये दाखल झाली. ऐश्वर्याला पहिल्या प्रयत्नात यशाने हुलकावणी दिली असली, तरी तिने दाखवलेली जिद्ध ही देशातील आणि स्पर्धेतील चर्चेचा विषय ठरली.


ऐश्वर्या कोल्हापूरमध्ये दाखल होताच कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी तिच्या निवासस्थानी जावून भेट घेत कामगिरीचं कौतुक केले. तसेच तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ऐश्वर्याचे प्रशिक्षक हर्षद देसाई, मानल देसाई, ऐश्वर्याची आई अंजली, वडील दयानंद जाधव उपस्थित होते. 


ऋतुराज पाटील यांनी ऐश्वर्याला शुभेच्छा देतानाच भविष्यात सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही सुद्धा दिली. त्यांनी भेटीची माहिती सोशल मीडियातून दिली आहे. 


ते म्हणतात, विम्बल्डन सारख्या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एवढ्या लहान वयात भारताचे प्रतिनिधित्व करणारी ऐश्वर्या एकमेव खेळाडू ठरली आहे. तिच्या या जिद्दीचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. यावेळी तिच्याकडून स्पर्धेबद्दल अनुभव जाणून घेतले. आज तिचे आणि तिच्या पालकांचे विशेष अभिनंदन केले. मला विश्वास आहे, येणाऱ्या काळामध्ये टेनिस विश्वात ऐश्वर्या कोल्हापूरचे आणि भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी उंचावेल. तिच्या पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा!


आशियाई टेनिस फेडरेशनच्या वतीने इंग्लंड येथे झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत आशियाई संघाकडून 14 वर्षांखालील वयोगटात भारताचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव कोल्हापूरची ऐश्वर्या जाधव होती.  दरम्यान, ऐश्वर्या उद्या फ्रान्समध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या