Maharashtra Rains Updates :  राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे (Heavy Rains In Maharashtra). कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर्व विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडाऱ्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात ठिकठिकाणी देण्यात आलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. 


पालघर जिल्ह्यात पावसाने सलग चार दिवस दमदार हजेरी लावली. आज पाचव्या दिवशीही पावसाची रिमझिम सुरूच असून रविवारी, डहाणू शहरामध्ये सर्वाधिक 315 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर तलासरी तालुक्यालाही पावसाने झोडपून काढलं. तर तलासरी तालुक्यातील कोमगाव येथून वाहणाऱ्या गावघात नदीला पूर आल्यामुळे या पुरात एक महिला वाहून गेल्याची घटना घडली आहे. सूर्या आणि वैतरणा नद्यांनाही मोठा पूर आला आहे. तर दुसरीकडे सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण 58 टक्के भरलं असून जिल्ह्यातील इतर लहान धरण ही 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत.


भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पवनी तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे आसगावातील अनेक घरांमध्ये हे पावसाचं पाणी शिरलं. गावाला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं आहे. तर घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याकरिता जिल्हा शोध आणि बचाव पथक आसगाव येथे पोहोचलेला आहे. लाखांदूर तालुक्यातील ओपरा या गावातही घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसचं या भागात शेतीचंही मोठं नुकसान झाले आहे. दरम्यान आज भंडाऱ्या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.


सांगलीत मुसळधार पाऊस... 


सांगलीतही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सांगली कोल्हापूरला जोडणार वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर कार्वे, ढगेवाडी जक्राईवाडी आणि डोंगरवाडी येथील तलाव्याच्या  पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. शिराळा परिसरात आणि चांदोली पाणलोट क्षेत्रात पडत  असलेल्या दमदार पावसामुळे नदीला पूर आला आहे. वारणा नदीवरील जुना चिकुर्डे ते वारणा नगर पुल तीन दिवस पाण्याखाली गेला असून सध्या या पुलावरून चार ते पाच फूट पाणी आहे. 


पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ, प्रशासन सतर्क


कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने इशारा पातळीकडे आपली वाटचाल केली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 38 फूट 10 इंच इतकी पोहोचली आहे. जिल्ह्यातील 84 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 



धुळे: शिंदखेडा तालुक्यात एका महिन्यात 400 मिलिमीटर पावसाची नोंद


धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात गेल्या वर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तर यंदा गेल्या एक महिन्यापासून होत असलेल्या दमदार पावसामुळे शिंदखेडा तालुक्यातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. शिंदखेडा तालुक्यात एका महिन्यात तब्बल 400 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या वर्षी जुलै महिन्यात 100 मिलिमीटरच्या आतच पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शिंदखेडा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे करण्याची मागणी आता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाले होते तर यंदा अतिवृष्टीमुळे पिके सडून जाऊ लागली आहेत. यामुळे पुढील काही दिवसात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची देखील वेळ येऊ शकते. या पार्श्वभूमीवर शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.



सिद्धेश्वर धरणात फक्त पाच टक्केच पाणी,  शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम 


हिंगोली जिल्ह्यासह परभणी नांदेड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेती ज्या धरणाच्या पाण्यामुळे ओलिताखाली खाली आली आहे अशा सिद्धेश्वर धरणात आतापर्यंत फक्त पाच टक्के पाणीसाठा जमा झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा चिंतेत वाढ झाली आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला आहे. तर, अर्ध्याहून जास्त जुलै महिना संपला तरी मात्र अपेक्षित असा जोरदार पाऊस न झाल्याने सिद्धेश्वर धरणाच्या पाणी पातळीमध्ये विशेष अशी वाढ झालेली नाही. उन्हाळ्याच्या शेवटपर्यंत सिद्धेश्वर धरणामध्ये मृत पाणीसाठा शिल्लक होता आणि आता पाणी साठा फक्त पाच टक्के इतका वाढला आहे त्यामुळे जोरदार स्वरूपाच्या पावसाने बरसावे  धरण पूर्ण क्षमतेने भरावे असेच अपेक्षा शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.