Maharashtra Rain Updates: पावसाळा (Rain Updates) सुरू होऊन अडीच महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप राज्यात सर्व दूर पाऊस झालाच नाही. पावसाची स्थिती अशीच राहिली राज्यात भीषण दुष्काळ पडू शकतो, अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाटत आहे. म्हणूनच राज्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याची आग्रीम रक्कम मिळण्याची गरज निर्माण झाली आहे. काय आहे राज्यातील पावसाची स्थिती? 


मौज गावच्या मारुती शिंदे यांनी जून महिन्यात चांगला पाऊस झाल्यानं दोन एकरावर सोयाबीनची पेरणी केली. जमिनीत ओल असल्यानं सोयाबीन उगवून तर आलं, मात्र पावसानं गेल्या काही दिवसांपासून असा खंड दिला की, या सोयाबीनची पुरती वाट लागली. सोयाबीनला फुलं लागण्याच्या काळातच पाण्याअभावी ते असं करपून जात आहे. त्यामुळे आता जरी पाऊस आला तरी या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून त्यावर केलेला खर्च देखील त्यांना मिळणार नाही.


याच गावच्या नागोराव डावकर यांनी एक एकरावर बाजरी आणि एक एकरावर कापसाची लागवड केली सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानं त्यांनी खत आणि मशागतीवर मोठा खर्च केला. मात्र गेल्या 20 ते 30 दिवसांपासून पावसानं खंड दिलाय त्यामुळे कापसाची वाढ खुंटली आहे, तर बाजरीच्या पिकाची अवस्थाही अत्यंत वाईट झाली आहे. भर पावसाळ्यात जुलै आणि ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानं शेतकऱ्यांना आता दुष्काळाचं सावट सतावू लागलं आहे.


बीडमध्ये पाऊस नाही, धरणंही कोरडी 


पावसाळा सुरू झाल्यापासून बीड जिल्ह्यात अद्याप एकही मोठा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील माजलगाव आणि मांजरा धरणांमधल्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तर दुसरीकडे रिमझिम पडणाऱ्या पावसावरही पीकं हिरवी दिसत आहेत. तरी त्यातून काहीच उत्पन्न मिळणार नसल्यानं शासनानं तात्काळ पंचनामे करून अग्रीम पीक विम्याची तरी मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. ही परिस्थिती फक्त एकट्या बीड जिल्ह्यातच नसून ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस झाला, हे पाहुयात... 



  • कोकण विभाग : सरासरी 766 मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात 217 मिलिमीटर पाऊस झाला. म्हणजेच, 28 टक्के इतका पाऊस झाला

  • नाशिक विभाग : सरासरी 197  मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात 40 मिलिमीटर पाऊस झाला. म्हणजेच, 20 टक्के इतका पाऊस झाला

  • पुणे विभाग : सरासरी 247 मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात 54 मिलिमीटर पाऊस झाला. म्हणजेच, 22 टक्के इतका पाऊस झाला

  • छत्रपती संभाजीनगर : सरासरी 193 मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात 44 मिलिमीटर पाऊस झाला. म्हणजेच, 22 टक्के इतका पाऊस झाला

  • अमरावती : सरासरी 231 मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात 68 मिलिमीटर पाऊस झाला. म्हणजेच, 29 टक्के इतका पाऊस झाला

  • नागपूर : सरासरी 347 मिलिमीटर पाऊस पडतो, 193 प्रत्यक्षात  मिलिमीटर पाऊस झाला. म्हणजेच, 55 टक्के इतका पाऊस झाला


दरम्यान, मराठवाड्यातील एकाही मोठ्या धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. एकीकडे रोज पिण्याच्या पाण्यासाठीच्या टँकरची आकडेवारी वाढत असतानाच घराच्या नळाला आठवड्यातून दोनदा येणारं पाणी आता आठवड्यातून एका दिवसावर आलं आहे. मराठवाड्याला रिटर्निंग मान्सूनचा मोठा फायदा होत असला तरी सध्याची विदारक परिस्थिती धडकी भरवणारी आहे.