सांगली :  राज्यात पावसानं अक्षरशा हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सांगलीत देखील परिस्थिती चिंताजनक अशीच आहे.  सांगलीकर आणि कृष्णा नदी काठची धाकधूक आणखी वाढली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी तब्बल 54.5 फुटांपर्यंत पोहोचली आहे.  2005 सालची 53 फुटांची महापुराची पातळी नदीने रात्री ओलांडली आहे. 52 फुटापर्यंत पाणी पातळी गेल्यानंतर पातळी स्थिर होईल हा पाटबंधारे विभागाचा अंदाजही फोल आहे.  आता 54 फुटांवर पाणी पातळी स्थिर राहणार की आणखी पातळी वाढणार याकडे सांगलीकरांचं लक्ष लागून आहे. 


Maharashtra Rains LIVE : सांगलीकरांची धाकधूक वाढली; कृष्णा नदीची पाणी पातळी तब्बल 54.5 फुटांपर्यंत


अर्धी सांगली आणि आयुक्तांचे निवासस्थानही पुराच्या पाण्यात


सध्या पुराच्या पाण्यामुळं अर्धी सांगली पाण्यात गेली आहे. सोबतच सांगली महापालिकेच्या आयुक्तांचे निवासस्थानही पुराच्या पाण्यात गेलं आहे.  सांगली महापालिकेच्या आयुक्तांच्या निवासस्थानाला पुराच्या पाण्याचा वेढा आहे.  2019 च्या पुराचाही आयुक्तांच्या बंगल्याला  फटका बसला होता. त्यानंतर बंगल्याची मोठ्या प्रमाणावर डागडुजी केली होती.  



दरम्यान पुरामुळं नदीतील पाणी उपसा स्टेशन पाण्याखाली गेले आहे.  त्यामुळं शहरातील विश्रामबाग, कुपवाड या भागात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तसेच दुधाची देखील काही प्रमाणात टंचाई भासत आहे.  शहरातील विश्रामबाग, कुपवाड, मिरजच्या काही भागात नदी काठचे बहुतांश लोक स्थलांतरित झाले आहेत. 



सांगलीचे पालकमंत्री काय म्हणाले...
सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, कृष्णा नदीची 52ते 54 फुटापर्यंत पातळी जाऊन स्थिर राहील असं वाटतं.  नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे.  पाऊस पडला तर पुन्हा परिस्थिती वाईट होऊ शकते. अलमट्टीतून यावेळी योग्य वेळी विसर्ग झाला खरा पण कोयना धरणासह कृष्णा नदी पात्र परिसरात एका दिवसात मोठा पाऊस झाला आहे. यामुळं कोयना धरणातून मोठा विसर्ग सतत करावा लागला आहे.  राज्यभरात पूरपरिस्थिती आणि दरड कोसळण्याच्या या संकटात महाविकास आघाडी सरकार लोकांशी पाठीशी आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.