जळगाव : आम्ही कोणाला सुरुंग लावत नाही मात्र  तो लावण्याची संधी लोक आम्हाला स्वतःहून देत असतात, अशा प्रकारचं वक्तव्य जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुक्ताईनगर येथील शिवसंपर्क अभियानात केलं आहे. मुक्ताई नगर मतदार संघातील अडी अडचणी सोडविण्यासाठी मुक्ताई नगरचे आमदार चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यासाठी शिवसंपर्क अभियान आयोजित केलं होतं. या अभियानात मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुक्ताई नगर येथील पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्याकडून विकास करण्यासाठी लागणाऱ्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यातील ज्या त्वरित सोडविण्यासारख्या होत्या त्या सोडविणयासाठी यंत्रणेला सूचना आणि आदेश केले आहेत. 


मुक्ताई नगर हा गेल्या चाळीस वर्षांपासून एकनाथ खडसे यांचा बाले किल्ला राहिला आहे. मात्र या चाळीस वर्षात म्हणावा असा विकास या ठिकाणी होऊ शकलेला नाही, त्या पार्शवभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची हजेरी राजकीय दृष्ट्या चर्चेचा विषय राहिला आहे. थेट एकनाथ खडसे यांच्यावर नाव घेत टीका न करता गुलाबराव पाटील यांनी म्हटल आहे की, "मागच्या काळात काय काम झाली किंवा नाही, या विषयावर टीकाटिपणी आपण करणार नाही, मात्र येत्या दोन वर्षात कधी झाला नसेल असा विकास या मुक्ताईनगरचा आपण करणार असल्याचं म्हटलं आहे. यावेळी जळगाव मनपामध्ये भाजप नगरसेवकांचा एक गट फुटून सेनेला येऊन मिळाल्याने जळगाव मनपामध्ये भाजपा ची सत्ता जाऊन सेनेची सत्ता आली असल्याचं पाहायला मिळाले आहे.


जळगाव मनपात भाजपला सुरुंग लावला आणि सत्ता मिळविली अशाच प्रकारे आपण मुक्ताई नगरपालिकेत ही करणार का असा सवाल विचारला असता, मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर देताना म्हटलं आहे की, आम्ही कोणालाही सुरुंग लावत नाही, मात्र लोकच आम्हाला सुरुंग लावण्याची संधी देतात.


भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर असताना त्यांनी महाआघाडी सरकारवर टीका करीत असताना पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी म्हटल आहे की, "ज्या भाजपने बावनकुळे यांच्या सारख्या ओबीसी नेत्याला तिकीट दिले नाही. त्यांना संपविण्याचा प्रयत्न केला, त्या बावनकुळे यांनी अशा पक्षाचं गुणगान गाऊ नये, अगोदर आपलं दुकान पक्के करावे आणि मग आमच्या वर टीका करावी."


एकनाथ खडसे यांच्यावर आणि त्यांच्या परिवारावर ईडीच्या कारवाई संदर्भात पाटील यांना विचारलं असता त्यांनी म्हटल आहे की, "ईडीच्या कारवाया आता आपल्यासाठी नवीन राहिल्या नाहीत. जसं जिल्ह्यात एल्सिबी पोलीस खातं आहे, तसं आता ईडीचं झालं आहे. ईडीचं आणि सिडीचं पुढे काय होतं? असं म्हणून या विषयावर अधिक बोलणं त्यांनी टाळलं असलं तरी मला कोणी ईडी लावली तर मी सिडी लावेल म्हणाऱ्या एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याची आठवणही त्यांनी करून दिली आहे.