सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत झालेल्या  नुकसानीमध्ये  जिल्ह्यातील 379 गावे बाधित झाली असून 18 जणांचा मृत्यू, 24 जण बेपत्ता, 3 हजार 24 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील  एकूण 1 हजार 324  कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरित करण्यात आलेले असून एनडीआरएफ एक टीम कार्यरत असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.


जिल्ह्यातील एकूण 167 गावे पुर्णत: व 212 गावे अंशत: अशी एकूण 379 गावे बाधित झाली आहेत. यामध्ये वाई तालुक्यातील 44 गावे पुर्णत: व 7 गावे अंशत: अशी एकूण 51 गावे बाधित झाली आहेत. कराड तालुक्यातील एकूण 30 गावे अंशत: बाधित झालेली आहेत. पाटण तालुक्यातील 10 गावे पुर्णत: व 60 गावे अंशत: अशी एकूण 70 गावे बाधित, महाबळेश्वर तालुक्यातील 113 गावे पुर्णत: बाधित, सातारा तालुक्यातील 13 गावे अंशत: बाधित, जावली तालुक्यातील 102 गावे अंशत: बाधित झाली आहेत.


साताऱ्यात 18 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण बेपत्ता आहेत तर 3 हजार 24 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वाई तालुक्यात 3 मृत्यू, 2 जण बेपत्ता व 20 पशुधन मृत्यू, कराड तालुक्यात 3 हजार पशुधन मृत्यू (कोंबडी), पाटण तालुक्यात 12 मृत्यू व 20 जण बेपत्ता, महाबळेश्वर तालुक्यात 1 मृत्यू व 2 पशुधन मृत्यू, सातारा तालुक्यात 2 पशुधन मृत्यू, जावली तालुक्यात 2 मृत्यू व 2 जण बेपत्ता झाले आहेत.


1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जण स्थलांतरित


सातऱ्यातील वाई, कराड पाटण व महाबळेश्वर तालुक्यातील एकूण 1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. यामध्ये  वाई तालुक्यातील 72 कुटुंबातील 390 जण, कराड तालुक्यातील 876 कुटुंबातील 3 हजार 836 जण, पाटण तालुक्यातील 325 कुटुंबातील 1 हजार 300 जण, महाबळेश्वर तालुक्यातील 51 कुटुंबातील 130 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.


कार्यरत टीम


जिल्ह्यात एकूण 3 एनडीआरएफच्या टीम कार्यरत असून एका टिमची अतिरिक्त मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.