परभणी : Maharashtra Rain Update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यानं पेरणी झाल्यानंतर आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मराठवाड्यात देखील जोरदार पाऊस झाला. यात परभणी शहर आणि परिसरात तब्बल 232 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 2005 आणि 2006 नंतर 15 वर्षानंतर एवढा पाऊस पडला असल्याचं सांगण्यात आलंय.
या पावसामुळे अनेक नदी नाले,ओढ्यांना पूर आला आहे. काल रात्री परभणीच्या पिंगळी पासुन पुढे मिरखेल येथे ओढ्यात सात पुरुष, पाच महिला अशा 12 जणांसह दहा शेळ्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या होत्या. ही बाब प्रशासनाला कळताच उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी पवन खांडके, मंडळ अधिकारी पक्वाने, अग्निशमन दलाचे अधिकारी व स्थानिक गावकऱ्यांनी संयुक्त मदतकार्य राबवत बोटीच्या सहाय्याने या 12 जणांसह 10 शेळ्यांना सुखरूपपणे बोटीने बाहेर काढले. हे रेस्क्यू ऑपरेशन रात्री आठ ते पहाटे दीड वाजेपर्यंत चालले.
Maharashtra Rain Update : वरुणराजा बरसला, शेतकरी सुखावला... राज्यातील बहुतांश भागात पावसाची हजेरी
परभणी शहर आणि परिसरात 15 वर्षानंतर सर्वाधिक पावसाची नोंद
परभणी शहर आणि परिसरात तब्बल 232 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान शास्त्र विभागात या पावसाची नोंद कऱण्यात आली आहे. 2005 आणि 2006 नंतर 15 वर्षानंतर एवढा पाऊस पडला असल्याचं सांगण्यात आलंय. 24 तासात 232 मिमी पाऊस पडण्याची आजपर्यंतची तिसरी वेळ आहे. 2005 साली 242 मिमी,2006 साली 234 मिमी तर 2021 साली म्हणजे यंदा 232 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. कालच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक रस्ते अजुनही बंदच आहेत.
मराठवाड्यात सर्वत्र पावसाची हजेरी
मागच्या 24 तासात मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय.परभणी,नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय, उस्मानाबादमध्ये ही जोरदार पाऊस झालाय तर बीड,लातूर,औरंगाबादमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. ज्यामुळे अनेक पिकांना मात्र जीवदान मिळाले असले तरी नांदेड आणि परभणी शहराची अवस्था मात्र फार वाईट झाली होती. सतत पडत असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि सखल भागात पाणीच पाणी झाले होते.परभणीत भीम नगर,क्रांती नगर,इंदिरा गांधी नगर,रामकृष्ण नगर मधील काही घरात पाणी शिरले तर रेल्वेस्थानक, बस स्थानक पूर्ण पाण्यात गेले होते.नांदेडमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळालीय.