Maharashtra Rain Update: लोणावळ्यात (Lonavla) गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 273 मिलिमीटर पावसाची (Rain) नोंद झाली आहे. तर मागील तीन दिवसांत 705 मिमी पाऊस कोसळला आहे. थंड हवेचे ठिकाण असलेलं लोणावळा हे घाटमाथ्यावर असल्याने दरवर्षी इथे पावसाचा जास्त नोंद होते. राज्यात सध्या जोरदार हजेरी लावल्याचं चित्र आहे. तसेच येत्या 48 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यत हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाऊस कमीच
यंदा तीन दिवसांत जरी विक्रमी पाऊस झाला असला तरी मागील वर्षाच्या तुलनेत हा पाऊस कमीच असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत लोणावळ्यात 2622 मिमी पाऊस बरसला होता. पण यंदा केवळ 2017 मिमी इतक्याच पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचा जर जोर असाच कायम राहिला तर काहीसा दिलासा मिळणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.
शाळांना सुट्टी जाहीर
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार लोणावळ्यात गुरुवार (20 जुलै) रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवमान खात्याने दिला असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट
सलग दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रायगड आणि पुण्यातील घाट माथ्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून पालघर, सातारा, पुणे आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांत किती मिमी पावसाची नोंद?
गेल्या चोवीस तासांमध्ये महाबळेश्वर, दापोली, चिपळूण यांसारख्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये 196.0 मिमी इतका पाऊस बरसला तर दापोली 255.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. चिपळूणमध्ये 152.0 मिमी पाऊस झाला असून पोलादपूरमध्ये 224.5 मिमी पाऊस बरसला आहे. तर लोणावळ्यात असलेल्या लवासामध्ये 77.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
त्यामुळे लोणावळ्यातील नागरिकांना देखील काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं असून पर्यटकांना देखील काही ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात येत आहे. पावसामुळे डोंगराळ भागामध्ये दरड कोसळण्याची भीती असल्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हे ही वाचा :
Maharashtra Rain : राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज