Vidarbha Rains : मागील तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे (Rain) अनेक जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. सध्या पुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. पण पूर ओसरल्यानंतर अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. या पुराचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना (Farmer) बसला आहे. लाखो हेक्टरवरील शेतपिकांचे या पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांचे देखील यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं चित्र सध्या विर्दभात आहे.
चंद्रपूरमध्ये अनेक गांवाना पुराचा विळखा
गेल्या तीन दिवसांपासून चंद्रपूर शहरातील हजारो घरांना पुराच्या पाण्याचा विळखा बसला आहे. चंद्रपूर शहरात शिरलेलं पुराचं पाणी सोमवार दुपारपासून ओसरायला सुरुवात झाली आहे. पण तरी अजूनही अनेक भागात पाणी साचले आहे. तसेच चिखळ, वाहून आलेला कचरा यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याचं सांगण्यात येत आहे.चंद्रपूरमध्ये शेतातील खत आणण्यासाठी शेतकऱ्यांचा पुरातून जीवघेणा प्रवास देखील केला आहे. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे जलमय झालेल्या शेतामधील खत वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वर्धा नदीला पूर आला आणि पाऊस नसतानाही या पुराचा फटका चंद्रपूर जिल्ह्याला बसला आहे.
बुलढाण्यात पावसाचं थैमान
अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. बुलढाण्यात जवळपास 61, 470 हेक्टवरील शेतपिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असणारा बळीराजा पावसामुळेच पुन्हा एकदा चिंतेत आला आहे. बुलढाण्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये 7210 घरांची पडझड झाली आहे. तर या पुराच्या पाण्यात 203 जनावरं वाहून गेली आहेत. बुलढाण्यात पावसामुळे अनेक रस्त्यांचं नुकसान झालं आहे. तसेच अनेक गावांना जोडणाऱ्या जवळपास 36 पुलांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.
वाशिममध्ये पावसामुळे नुकसान
वाशिम जिल्ह्यात देखील यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीला देखील उशीर झाला आहे. आता कसंबसं पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतात पिकं उगवायला सुरुवात केली होती. पण मुसळधार पावसामुळे उगवलेल्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. मागील पंधरा दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात कारंजा तालुका, मानोरा तालुका आणि मंगरुळपीर तालुक्यात पावसाने दमदार बॅटींग केली. या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्याचं पाहायला मिळालं. वाशिम जिल्ह्यात 5 जुलै ते 22 जुलैपर्यंत झालेल्या पावसामुळे 45 हजार 874 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.