मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील मंदिरं बंद आहेत. राज्यभरातून मंदिरं उघडण्यासाठी मागणी होत आहे. अशातच आता मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोपांचं युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. बार आणि दारूची दुकानं सताड उघडी असताना मंदिरं मात्र डेंजर झोन आहेत का? असा सवाल अमृता फडणवीस यांनी केला आहे. 'वाह प्रशासन' म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता अमृता फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.


असमर्थ ठरल्यानंतर काही वेळा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी काही वेळा प्रमाणपत्र नक्कीच गरजेचं असतं, असा टोला देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. शिवसेनेचं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी राज्यपालांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलं होतं. याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी वापरलेले शब्द नक्कीच ठाकरे सरकारवर निशाणा साधणारे आहेत.


अमृता फडणवीस यांचं ट्वीट :





आधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा : नितेश राणे


राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. या पत्राला उद्धव ठाकरेंनीही उत्तर दिलं आहे. या प्रकरणावरून सध्या अनेक प्रतिक्रीया समोर येत आहेत. अमृता फडणवीस यांच्यानंतर नितेश राणे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावेळी 'आधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.


नितेश राणे यांचं ट्वीट :





नितेश राणे यांनी ट्वीट केलं असून ते म्हणाले की, "यासंदर्भात उत्तर द्यावं असं वाटत नाही का…मिस्टर सीएम? की नेहमीप्रमाणे हे फक्त राजकारण होतं? इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा."


पाहा व्हिडीओ : बार,दारुची दुकानं उघडली,मग मंदिरं डेंजर झोनमध्ये का?;अमृता फडणवीसांचा सरकारला टोला



काय आहे नेमकं प्रकरण?


राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले होते. सोबतच मुख्यमंत्र्यांना हिंदुत्त्वाची आठवणही करुन दिली. "बार-रेस्टॉरंट सुरु झाले, देवाचं कुलुप बंद का? तुम्हाला हिंदुत्त्वाचा विसर पडला का? मंदिरं सुरु करु नये असे दैवी संकेत मिळतात का?" असे सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केले होते.


या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उत्तर दिलं आहे. माझ्या हिंदुत्त्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. मुंबईला पीओके म्हणणाऱ्याचं हसत-खेळत स्वागत करणं माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे. तसेच प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल तुमच्या विनंतीचा सरकार जरुर विचार करेल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलं होतं.


मंदिरं खुली करण्यासाठी भाजपचं राज्यव्यापी आंदोलन


राज्यातील व्यवहार पूर्वपदावर येत असली तरी देवाची दारं अजूनही बंदच आहेत. मंदिराची दारं खुली करण्यासाठी भाजपने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. "मंदिरे बंद, उघडले बार, उद्धवा बेधुंद तुझे सरकार" अशा घोषणांसह विविध ठिकाणी भजन, घंटानाद आणि उपोषण केलं जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


मुंबईला PoK म्हणणाऱ्याचं हसत स्वागत करणं माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही, मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना उत्तर