मुंबई : हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला मध्यरात्री अवकाळी पावसानं झोडपलं. नांदेड, लातूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, अकोला, परभणी, भंडारा या जिल्ह्यांसह अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळं ज्वारी, गहू, केळी, भुईमूग, हरभरा पिकांसह द्राक्ष पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळं शेतकरी संकटात आला आहे.
नाशिक : नाशिकसह राज्यातील अनेक भागात, अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यासंदर्भाक अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. कृषिमंत्री दादा भुसे स्वतः लक्ष घालत आहेत, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. सरकारी तिजोरी खाली झाल्यानं मागील नुकसानीची शेतकऱ्यांना पूर्ण मदत करता आली नाही. राज्याचे केंद्राकडे 25 ते 30 हजार कोटी बाकी आहेत, असंही ते म्हणाले.
नांदेड : नांदेड जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांना मोठा फटका बसलाय. मध्यरात्री पासून जिल्ह्यात सर्वत्र विजांच्या गडगडाटासह वादळी वारे आणि पाऊस सुरू झाला. मध्यरात्री पासून सुरू असलेल्या पावसाचा जोर होता जो सकाळ झाली तरी कमी झाला नव्हता. सध्या देखील जिल्ह्यात पावसाची चांगलीच रिपरिप सुरुय. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, केळी, भुईमूग, हरभरा, ज्वारीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून चालू असलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांत मात्र चिंतेचे वातावरण आहे.
लातूर जिल्ह्यावर अवकाळीची अवकृपा : रब्बी पिकासह फळबागांचे नुकसान
लातूर जिल्ह्याभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे...निसर्गाचा लहरीपणा कायम शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरलेला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारी मध्यरात्री पावसाने हजेरी लावली. आज सकाळ पासूनच पावसाची रिपरिप सुरूच आहे .यामध्ये रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात देखील अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागला होता. आता रब्बीची पिके जोमात असतानाच गुरुवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जिह्यात यंदा हरभरा पिकाचा विक्रम पेरा झाला होता. पीक अंतिम टप्प्यात असताना पावसाने हजेरी लावल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढण्यासाठी यंदा शेतकऱ्यांनी गहू, हरभरा या पिकावर भर दिला होता. सर्व काही वेळेत झाल्याने आता भरघोस उत्पादन होणार असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत होते. मात्र, एका रात्रीत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ज्वारीची पडझड झाली आहे तर द्राक्ष, आंबा या फळबागांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात रब्बीचा पेरा 3 लाख 27 हजार हेक्टरवर झाला होता. रब्बीतील प्रमुख पीक हे हरभरा असून तब्बल 2 लाख 28 हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र, खरिपातील सोयाबीन प्रमाणेच हरभरा हे पीक अंतिम टप्प्यात असताना पावसाने हजेरी लावली आणि होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे आता नुकसभारपाईची मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.
जिल्ह्यात कुठे झाला पाऊस ?
जिल्ह्यातील लातूर शहर,लातूर ग्रामीण,रेणापूर,औसा,किल्लारी ,निलंगा,अहदमपूर, उदगीर,जळकोट,चाकूर या भागातील कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती..या भागात मध्यरात्री पावसाचा जोराचा सडाका पडला होता ...त्यानंतर पावसाने जोर कमी केला ..मात्र रिपरिप सकाळ पर्यंत सुरूच होती...या भागातील काढणीला आलेली पिके त्यात गहू हरभरा आणि ज्वारी चा समावेश आहे ..या पावसाच्या माऱ्यात सापडली आहेत...ज्वारी काळी पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत.
परभणी जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार, पहाटेपासून रिपरिप
परभणी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. मध्यरात्री सर्वत्र विजांच्या गडगडाटासह वादळी वारे आणि पाऊस झालाय. तर पहाटे पावसाचा जोर कमी होऊन पावसाची चांगलीच रिपरिप सुरुय.या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहु, हरभरा,ज्वारीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
वाशिम जिल्ह्यात परत अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यानंतर रात्री मध्यम स्वरूपात पावसाला सुरुवात झाली. आता जोर कमी आल्यानं शेतकऱ्याचं जीव भांड्यात पडला. कारण नेमका काढणीला आलेलं रब्बी पीक धोक्यात आलं आहे.
नालासोपारा : वसई विरार नालासोपारा शहरात रात्री 10 वाजता विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू झाली आहे.
कल्याण : आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कल्याण डोंबिवलीमध्ये सोसाट्याचा वारा सुरू होता. तासाभरातच पावसाची रिपरिप सुरू झाली. काही काळ पावसाने विश्रांती घेतली मात्र पुन्हा साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली अर्धा तास रिम झिम पाऊस सुरू होता.