Maharashtra Rain : येत्या पाच दिवसात राज्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उद्यापासून ( 2 जुलैपासून) मुसळधार पावसाचा नवीन स्पेल सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. 


मुंबई परिसरात पावसाची जोरदार हजेरी


मुंबईसह उपनगरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. पाणी साचल्यामुळं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मागील तीन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात 5.59  टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूण सात धरण आणि भातसा धरणातील राखीव पाणीसाठा मिळून मागील तीन दिवसात पाणीसाठ्यात 6.3 टक्के  वाढ झाली आहे. 28 जून रोजी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठा 7.26 टक्के होता. त्यात वाढ होऊन आज सकाळी ऐकून पाणीसाठा 12.85 टक्के झाला आहे. त्यामुळे मुंबईला साधारणपणे 18 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा मागील तीन दिवसांच्या पावसामुळे या सात धरण क्षेत्रात जमा झाला आहे. सध्या ठाणे परिसरातही जोरदार पाऊस सुरु आहे.


पुण्यात जोरदार पाऊस


मुसळधार पावसाने पुण्याच्या कामशेत येथील इंद्रायणी नदीवर असलेला वाडीवळे साकव (मातीचा) पूल वाहून गेला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यामुळं वाडीवळे गावची दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहे. तर या गावाला जोडणाऱ्या वडीवळे, वळख बुधवडी, वेलवळी नेसावे खांडशी या गावांचा संपर्क तुटला आहे. इंद्रायणी नदीवर वाहतुकीसाठी नवीन पूल बांधण्यात येत आहे. परंतू स्थानिक शेतकरी, विद्यार्थी आणि दुग्ध व्यवसाय करणारे तसेच कामगारांची कुचंबणा होऊ नये यासाठी तीन महिन्यांपूर्वी हा तात्पुरता साकव पूल बंधारा टाकण्यात आला होता. मात्र मुसळधार पावसामुळं हा पूल वाहून गेला. इंद्रायणी नदीचा पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळं पाण्याची पातळी वाढली आहे.


रत्नागिरीत जोरदार पाऊस


गुहागरमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. चिपळूण खेड दापोली या परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणातील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडल्यानं प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या इशारा दिला आहे. 


महाराष्ट्रात अद्यापही हवा तसा पाऊस नाही


महाराष्ट्रात कोकण आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर पाऊस (Rain) बरसत असताना दिसत असला तरी उर्वरीत महाराष्ट्रात (Maharashtra) अद्यापही हवा तसा पाऊस झालेला नाही. जून महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी 209.8 मिमी पाऊस होत असतो. मात्र, यावर्षी राज्यात 1 जून ते 30 जून दरम्यान फक्त 113.4 मिमी पाऊस बरसला आहे. राज्यात पावसानं सरासरी देखील गाठलेली नाही. संपूर्ण देशात सर्वात कमी पावसाची नोंद ही मराठवाड्यात झाली आहे. अशातच मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आव्हानं वाढली आहेत. 


 पावसाचा यलो अलर्ट म्हणजे काय?


हवामान खात्याकडून अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट दिला जातो. यलो अलर्ट म्हणजे संबंधित शहरांमध्ये नैसर्गिक संकटाची शक्यता आहे. यामुळं नागरिकांच्या जनजीवनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळं सगळ्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या जातात.


महत्त्वाच्या बातम्या:


Traffic: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड वाहतूक कोंडी