Devendra Fadnavis : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात घडलेल्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केलं. बस दुभाजकाला धडकल्यामुळं डिझेलची टाकी फुटून बसला आग लागली. त्यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामधून आठ जण सुखरुप बाहेर आले आहेत. मृतदेहांची ओळख पटवून देण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींचा रुगणालयाचा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे. या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 


मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यात येणार


समृद्धी महामार्गाचे काम अतिशय चांगले करण्यात आले आहे. त्याठिकाणी स्मार्ट सिस्टीम लावण्याचे काम करण्यात येणार आहे.  उपाययोजना करत आहोत. याठिकाणी अपघात होणार नाहीत यासाठी प्रयत्न करत आहोत अशी माहिती उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, बसला आग लागल्यामुळं 25 जणांचे मृतदेह जळाले आहे. त्यामुळं त्यांची ओळख पटने अडचणीचे जात आहे. त्यामुळं मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी आता घटनास्थळी जाणार


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी आता घटनास्थळी जाणार आहोत. तिथे जाऊन आम्ही घटनेची सविस्तर माहिती घेणार असल्याचे फडणवीस म्हणाले. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. हा अपघात होण्याची नेमकी कारणं काय आहेत, याबाबतची माहिती घेत असल्याचे फडणवीस म्हणाले.


रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अपघात 


बुलढाण्यात (Buldhana) एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला आहे. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.


बस विदर्भ ट्रॅव्हल्सची 


अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याकडे जात होती. त्यावळेळी हा अपघात घडला. या बसमध्ये नागपूर, वर्धा, आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. डिझेलच्या संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या 33 प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Buldhana Accident : अपघाताची घटना अत्यंत दु्र्दैवी, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर : मुख्यमंत्री