Maharashtra Rain : राज्यभरात सुरू असलेला अवकाळी पाऊस (Unseasonal rain) हा 2 डिसेंबर पर्यंत राहणार आहे. हा पाऊस मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात कमी अधिक तीव्रतेने राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तवला आहे. नेमका राज्यात कोणत्या भागात कसा आणि किती नुकसान कारक पाऊस असणार आहे. शेतकऱ्यांनी आपली पीक वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे? याबाबतची माहिती पंजाब डख यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितली.
हवेचं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं अशी स्थिती
सध्या राज्यात अवकाळी पाऊस का पडतोय याबाबत देखील पंजाबराव डख यांनी माहिती सांगितली. पृथ्वीचं वाढतं तापमान हे अवकाळी पावसाला कारणीभूत असल्याचे डख म्हणाले. भविष्यात अवकाळी पावसाला, गारपीटीला सामोर जावं लागणार आहे. हवेचं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं अशी स्थिती निर्माण होत असल्याचे पंजाबराव डख म्हणाले. हा पाऊस 2 डिसेंबरपर्यंत राहणार असल्याचे डख म्हणाले.
कुठे किती दिवस पडणार पाऊस?
पूर्व विदर्भात हा पाऊस 1 डिसेंबरपर्यंत राहणार आहे. पश्चिम विदर्भात हा पाऊस 1 डिसेंबरपर्यंत पडणार आहे. हा पाऊस मुसळधार असणार आहे. ओढे नाले भरुन वाहतील असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. मराठवाड्यात मात्र 2 डिसेंबरपर्यंत पाऊस पडणार आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात हा पाऊस 1 डिसेंबरपर्यंत राहणार आहे. पण उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. मागील दोन दिलसात खूप गारपीट झाली आहे. पण आता गारपीट पडणार नसल्याचे डख म्हणाले. द्राक्ष उत्पादकांनी लक्षात ठेवावं की २ डिसेंबरला धुई येणार आहे. मराठवाड्यात पाऊस पडणार आहे. मात्र, त्याची तीव्रता अधिक राहणार नसल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली.
शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी
अवकाळी पावसाचा मोठा फटका द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना देखील फटका बसला असल्याचे डख म्हणाले. काळजी म्हणून शेतकऱ्यांनी किटकनाशकांची फवारणी करावी.ज्या शेतकऱ्यांनी ज्वारी अद्याप पेरली नाही, त्या शेतकऱ्यांना ज्वारी पेरायला काही हरकत नसल्याचे डख म्हणाले. दरम्यान, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहेत. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.