Maharashtra Rain : सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर कुठं पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगर आणि ठाणे जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि विदर्भातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पाहुयात कुठं नेमकी काय स्थिती राहणार.
या भागात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली असून, वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान, आज मुंबई महानगराला दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना आज (गुरुवार दिनांक 27 जुलै 2023) रोजी सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान आज मुंबईसह कोकण विभागाही मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आलाय. दुसरीकडे संपूर्ण विदर्भात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत आज अति मुसळधार पावसाचा इशारा, शाळांना सुट्टी
मुंबईत आज अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच रत्नागिरी, चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना देखील आज सट्टी जाहीर करण्या तआली आहे.
भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस
आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा भंडारा जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. मागील आठ दिवसांपासून पाऊस गायब झाल्यानं वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. परिणामी नागरिक या उकाड्यामुळं हैराण झाले होते. सकाळपासून प्रखर उष्णतेचे चटके बसत असताना रात्रीच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर, पावसाअभावी भात पिकाची लागवड खोळंबल्यानं चिंतातुर झालेल्या शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शाळांना सुट्टी जाहीर
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले असून जिल्ह्यातील जनजीवनावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. रात्री 11 वाजता शासकीय अहवालानुसार जिल्ह्यातील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे तर शास्त्री, बाव नदी, काजळी नदी आणि कोदवली या चार नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत. आजही हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळं जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: