Maharashtra Rain : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात सकाळपासूनच पावसाची (Rain) रिपरिप सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारली होती. मात्र, आता पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यानं बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. राज्यातील मुंबईसह ठाणे, पालघर, परभणी, नंदुरबार, हिंगोली, बुलढाणा, वर्धा, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये पावसाची रिपरिप सुरु आहे.
सकाळपासून राज्याच्या विविध भागात पाऊस सुरु असल्यामुळं शेती पिकांना जीवदान मिळणार आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची उभी पिकं वाया जाण्याच्या मार्गावर होती. पण पावसाला सुरुवात झाल्यानं पिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळं काही प्रमाणात शेतकऱ्यांची चिंता कमी झाली आहे.
परभणी शहरासह जिल्ह्यात पावसाची रिपरिप
अनेक दिवसानंतर परभणी जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. कधी जोरदार तर कधी हलक्या पावसाच्या सरी सर्वत्र कोसळत आहेत. अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचलं असून, पिकांसाठी हा पाऊस पोषक आहे. अनेक दिवसापासून पावसाअभावी सुकून जात असलेल्या सोयाबीन, कापूस आदी पिकांना या पावसामुळं मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, अजूनही जिल्ह्याला मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
बुलढाणा जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस
गेल्या दोन दिवसांपासून बुलढाणा जिल्हाभरात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आज सकाळपासून बुलढाण्यात दाट धुक्याची चादर पसरली आहे. बुलढाणा शहरातील धुक्यामुळे काही प्रमाणात वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.
पालघर जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर
गेल्या पंधरा दिवसापासून पालघर जिल्ह्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, कालपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. आजही काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर यायला सुरुवात झाली असून आज आणि उद्या पालघर जिल्ह्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सध्या चांगल्या पडत असलेल्या पावसामुळं जव्हार मोखाडा विक्रमगड या भागात घाटमाथ्यावरील नागली, वरई, बाजरी या पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, पालघर जिल्ह्यातील भात शेतीलाही जीवदान मिळालं आहे. त्यामुळं नागरिकांसह शेतकरी बागायतदारांना या पावसामुळं दिलासा मिळाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील कापूस आणि भात उत्पादकांना दिला
नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात दुसऱ्या दिवशी पावसाची रिपरिप सुरुच आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कापूस आणि भात पिकांना काही भागात जीवदान मिळालं आहे. मात्र, धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्यासाठी दमदार पावसाची अजून प्रतीक्षा कायम आहे.
हिंगोली जिल्ह्यात एक महिन्यानंतर पावसाची हजेरी
हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा हलका ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस सुरु आहे. कालपासून सुरू असलेल्या पावसामुळं शेतातील पिकांना जीवदान मिळालं आहे. कारण मागील महिनाभरापासून पावसानं उघडीप घेतल्यानं सर्व पिकं सुकत होती, अशाच परिस्थितीत कालपासून पावसानं हजेरी लावल्यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. मागील महिनाभरापासून शेतकरी पावसाची वाट पाहत होत. अखेर कालपासून हलक्या स्वरुपात का होईना परंतु पावसाने हजेरी लावल्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झालं असून हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. तर रात्री काही ठिकाणी जोरदार स्वरुपाचा पाऊस झाल्यानं सखल भागात पाणी साचलं आहे. परंतू शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या: