Maharashtra Rain : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर काही ठिकाणी शेती पिकांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. दरम्यान, मुंबईसह परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यासह, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाती काही जिल्ह्यात देकील पावसाची संततधार सुरुच आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.


कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी


कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र,  धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरु आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 41 फुटांच्या पुढे गेली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे. जिल्ह्यातील 74 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 7 राज्य मार्गांवर पाणी आलं आहे. तसेच जिल्ह्यातील प्रमुख 24 मार्ग पाणी आल्याने बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 31 मार्गांवर थेट संपर्क तुटल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. 7 राज्यमार्गांवर 12 ठिकाणी पाण्याने वेढा दिला आहे. प्रमुख 24 मार्गावर 26 ठिकाणी पाण्याचा विळखा आहे. 


पुणे पाऊस


भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे  जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे. पुण्यात संसतधार पाऊस सुरु आहे. दोन दिवस पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरातदेखील मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही जोरदार पावसानं हजेरी लावली. त्यासोबतच  लोणावळ्यात (Lonavala)  वरुणराजाने जोरदार हजेरी लावली आहे. नदी, नाले, धबधबे वाहू लागलेत, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. मात्र गेल्या 24 तासात दमदार पाऊस झाल्याने पाणी ओसंडून वाहू लागलं आहे. धबधबे देखील पर्यटकांना आकर्षित करत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी लोणावळ्यात अधिक पाऊस पडला आहे.


विदर्भातही पावसाची हजेरी


विदर्भातही जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत तर भंडाऱ्यात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एकंदरीत पूर्व परिस्थिती जर बघितली तर काही प्रमाणात पुराच्या पाण्याच्या पातळीत घट झालेली आहे संजय सरोरातील पाच दरवाजे उघडल्यामुळे ही स्थिती उद्भवली होती मात्र आता दहा पैकी दहा गेट हे बंद आहे मात्र गोसीखुर्द मधनं 16000 क्युसेस इतका विसर्ग सुरू असल्यामुळे पूर परिस्थिती आताही कायम आहे त्यामुळेच जिल्ह्यातील सतरा हून अधिक मुख्य आणि छोटे मार्ग अद्यापही बंद अवस्थेत आहे