Maharashtra Rain : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. मात्र, मुंबईसह परिसरात रात्रभर जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर झाल्यानं राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.  राज्यात कोकणसह, पूर्व विदर्भ, उत्तर आि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


राज्यात आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण समाधनाकारक राहिले आहे. जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नदी आणि धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुले आणि ऑगस्टमध्ये राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दरम्यान, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.   


मराठवाड्यात मोठं नुकसान 


मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे, शेतजमिनीचे, पशुधनाचे आणि विशेषत: घरांचं मोठं नुकसान झालं आहे. महसूल यंत्रणा व कृषी विभागाकडून बहुतांश पंचनामे सुद्धा करण्यात आले आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद विभागामध्ये 1 जुन ते 19 ऑगस्ट 2022 दरम्यान 570.80 मि.मी. पाऊस पडला असून सरासरी पाऊसाच्या तुलनेत 130.11 टक्के इतका पाऊस पडलेला आहे. एकूण 52 दिवसामध्ये हा पाऊस पडलेला आहे. औरंगाबाद विभागात एकूण 450 महसूल मंडळे असून त्यापैकी 207 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. औरंगाबाद विभागात सरासरी खरीप पेरणी क्षेत्र 48.57 लाख हेक्टर असून सन 2022-23 मध्ये 47.99 लाख हेक्टर क्षेत्रावर 98.80 टक्के पेरणी झाली आहे. सोयाबीन पिकाची 2450056.42 हेक्टर क्षेत्रावर व कापूस पिकाची 1372886.82 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. औरंगाबाद विभागामध्ये जुन ते जुलै 2022 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे एकुण 8,11,845 शेतकरी बाधित झालेले असून 5,87,466.41 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. 
 नागपूर


जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यात 2 लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार 1.14 लाख हेक्टरमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, धान व इतर पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल सादर केला होता. संततधार पाऊस ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याअखेरपर्यंत सुरू होता. या मुसळधार पावसामुळे पुन्हा 82,936 हेक्टरमधील पीक खराब झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने दिला आहे. 
सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत हे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सुमारे 70 टक्के पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. संत्रा, मोसंबी या फळबागांचा सर्वेक्षणात समावेश करण्यात आलेला नाही, त्याचा समावेश करण्याची मागणीही शेतकऱ्यांकडून होत आहे.


महत्त्वाच्या बातम्या: