Maharashtra Rain News: हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्चवण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईसह परिसरात देखील आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊयात राज्यातील आजची हवामानाची स्थिती.
पुढील 24 ते 26 तासांपर्यंत सतत पाऊस पडणार
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत मुंबईसह परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्यामुळं अनेक भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. कारण पाऊस किमान पुढील 24 ते 26 तासांपर्यंत सतत मध्यम ते मुसळधार असण्याची शक्यता आहे. दादर, वरळी, वांद्रे या पश्चिम उपनगरांमध्ये सर्वाधिक पाऊस पडेल असा अंदाज आहे. पश्चिमेकडील वारे कोकण किनारपट्टीवर योग्य आर्द्रतेसह संरेखित झाल्यामुळे मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
'या' जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोकणातील रायगड आमि रत्नागिरी या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
'या' भागात पावसाचा यलो अलर्ट
आज राज्यातील विविध भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये नाशिकसह पालघर जिल्ह्याचा समावेश आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पहाटेपासूनच मध्यम ते मुसळधार पाऊस
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पहाटेपासूनच मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळतोय. या पावासामुळं मुंबईतील काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळं वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, मंगळवारनंतर मुंबईतील पाऊस कमी झाला होता. मात्र, आजपासून पुन्हा मुंबईत पावासानं जोर पकडला आहे. दरम्यान, आज मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
परभणीकरांसाठी आनंदाची बातमी! येलदरी आणि निम्न दुधनाच्या धरणसाठ्यात वाढ