Maharashtra Rain News : सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. काही भागात जोरदार पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. तर अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. 


'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या जोन जिल्ह्यांमा पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


भंडारा जिल्ह्यात पावसाचा शेती पिकांना मोठा फटका


विदर्भातील अनेक जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळँ जनजीवन विस्कळीत झालं आहे. 19  ते 29 जुलै या दहा दिवसात झालेल्या भंडारा जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीचा नजर अंदाजचा सुधारित अहवाल भंडारा जिल्हा प्रशासनानं सादर केला आहे. यात 519 गावांना याचा फटका बसला असून 23 हजार 260 हेक्टर मधील पिकांचं नुकसान झालं आहे. या अतिवृष्टीचा फटका 49 हजार 197 शेतकऱ्यांना बसला आहे. भात पीक, तुर, सोयाबीन, बागायती शेती, कापूस या पिकांचा यात समावेश आहे. सर्वाधिक फटका पवनी तालुक्याला बसल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे.


राज्यातील बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस, धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ


गेल्या आठवडाभरापासून राज्यात पावसानं चांगलाच जोर धरला आहे. राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळं शेती पिकांना फटका बसला आहे. दरम्यान, चांगला पाऊस झाल्यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळं बहुतांश ठिकाणची धरणे निम्म्यावरच आली होती. मात्र, यावर्षी सुरुवातीपासूनच चांगला पाऊस होत आहे. त्यामुळं धरणांचा पाणीसाठी वाढत असून, धरणांची शतकाकडे वाटचाल सुरु आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Pune Rain : पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचे थैमान, खडकवासलातून विसर्ग वाढवला, भिडे पूल पाण्याखाली