Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. राज्यातील बहुतांश धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. तर काही धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


या भागात जोरदार पावसाचा इशारा


हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


मुंबईला पाणीपुरवठा करणारी चारही धरणं ओव्हर फ्लो


राजधानी मुंबईतही (Mumbai) गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे चारही धरणं ओव्हर फ्लो झाल्याने मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली. शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्याने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली असून तालुक्यातील चारही धरणं (Dam) ओव्हर फ्लो झाली आहेत. सर्वात आगोदर तानसा धरण ओव्हर फ्लो झाले होते, त्या पाठोपाठ मोडकसागर धरण व काल संध्याकाळी भातसा धरणही ओव्हर फ्लो होऊन वाहत आहे. विशेष म्हणजे रात्री अडीच वाजता मध्य वैतरणा धरण देखील ओसांडून वाहू लागल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. 



पंढरपूरला पुराचा धोका वाढला


पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा सुरु झाला आहे. त्यामुळं उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. यामुळं पंढरपुरात पुराचा धोका वाढला आहे. त्यामुळं नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. यापूर्वी 2006 साली उजनी धरणातून तब्बल सव्वा तीन लाख तर वीर धरणातून 1 लाख क्युसेक निसर्गाने पाणी सोडल्यानंतर पंढरपुरात सर्वात मोठा महापूर आला होता. त्यावेळी विठ्ठल मंदिराजवळ असणाऱ्या चौफाळा येथेही पाणी आले होते. यंदाही परिस्थिती तशीच असून ऑगस्टच्या सुरुवातीलाच सर्व धरणे भरली असून अद्यापही पावसाचे दोन महिने जायचे असल्याने पंढरपूरसह परिसरावर महापुराची टांगती तलवार  कायम आहे.



महत्वाच्या बातम्या:


उजनीत पाणी वाढलं, पंढरपूरला पुराचा धोका, आमदाराने घेतली तातडीची बैठक; 18 वर्षांपूर्वीच्या पुराची आठवण