Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी, आजही मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत देखील जोरदार पाऊस पडत आहे.
नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. दरम्यान, काल रात्रीही पावसाची दमदार बॅटिंग सुरुच होती. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीमुळे जिल्ह्यातील गोदावरी, आसना, मांजरा, पैनगंगा, मन्याड ह्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर जिल्ह्यातील छोटे मोठे 35 प्रकल्प तुडुंब भरले असून विष्णुपुरी प्रकल्प ही 74 टक्के क्षमतेने भरला आहे. पावसाच्या या संतधारमुळे पुराच्या व अतिवृष्टीच्या तावडीतून वाचलेली उर्वरित सोयाबीन, हळद, उडीद,मूग, कापूस, केळी ही पिकेही जाण्याचा मार्गावर आहेत.
Kolhapur Rains : दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे कोल्हापुरातील राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राधानगरी धरण 95 टक्के भरलं आहे. धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज सायंकाळपर्यंत उघडण्याची शक्यता आहे. तर पंचगंगा नदीची पाणी पातळी 37 फुटांवर पोहोचली आहे. सध्या शहर आणि परिसरात पावसाने उघडीप दिली असून धरण क्षेत्रातही पावसाची विश्रांती आहे.
Satara News : पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज घेता अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. कालपर्यंत 1 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असताना आता 1 लाख 25 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दरम्यान कोयना धरणाचे कधीही दरवाजे उघडले जाऊ शकतात. कोयना धरणात सध्या 80 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. कोयना आणि महाबळेश्वर परिसरात पावसाची संततधार कायम आहे.
Yavatmal Rain : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील नारळी परिसरामध्ये एक ते दीड तास मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं शेतामध्ये पाणी साचून कपाशी व सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ढग फुटी सदृश पाण्यामुळं नाल्यांना पूर आला आहे. शेतामध्ये नाल्याचे पाणी शिरुन सोयाबीन, कपाशी पिके खरडून गेली आहेत. शेतातील पिकासह शेतातील माती देखील पाण्यामुळे वाहून गेली आहे. या पुरामुळे अनेक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 49.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ब्रम्हपुरी तालुक्यात सर्वाधिक 127 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सावली 74 मिमी, गोंडपिंपरी 72 मिमी, मूल 71 आणि नागभीड येथे 66 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातून होणाऱ्या पाणी विसर्गामुळे वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं गड नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात सोनवडे तर्फ कळसुली-नरडवे जोडणारा लोखंडी साकव वाहून गेला आहे. सोनवडे दुर्गनगर येथे राहणाऱ्या नागरिकांना आता गावाला वळसा घालून फिरुन यावं लागणार आहे. मात्र गड नदीच्या पुराच्या पाण्यात लोखंडी साकव पत्याप्रमाणे नदीत वाहून गेला.
Bhandra Rain : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्याने गोसीखुर्द धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 33 पैकी 33 दरवाजे एक मीटरने उघडले आहेत. या 33 दरवाज्यातून 6973 क्युमेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे, विशेष म्हणजे धरण नियंत्रित असल्यानं प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला असला तरी नदी काठावरील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
Palghar News : पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु असून ठिकठिकाणी झाड आणि लाईटचे पोल उन्मळून पडत आहेत. बोईसर नवापूर रोडवरील कुंभवली नाका येथे मुख्य वीज वहिनीचा पोल चालत्या बाईकस्वारावर पडला. या दुर्घटतने योगेश कांतीलाल पागधरे हा गंभीर जखमी झाला असून त्याला तुंगा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत मुसळधार पावसामुळे गडनदीला आलेल्या पूराच्या पाण्यात सोनवडे तर्फ कळसुली-नरडवे जोडणारा लोखंडी साकव वाहून गेला. सोनवडे दुर्गनगर इथे राहणाऱ्या नागरिकांना आता गावाला वळसा घालून फिरुन यावं लागणार आहे. मात्र गडनदीच्या पुराच्या पाण्यात लोखंडी साकव पत्त्याप्रमाणे नदीत वाहून गेला
Sangli Rain : शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. चांदोली धरणाचे चार वक्राकार दरवाजे उचलून सांडव्यातून 1300 तर विद्युत निर्मितीतून 1700 असे एकूण 3000 क्यूसेक्सने वारणा नदीत पाणी सोडले जात आहे. त्यामुळं वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद झाली आहे. मुसळधार पावसाचे प्रमाण वाढल्यास आणखी विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळं नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Palghar Rain : पालघर जिल्ह्याच्या सर्वच भागात पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. त्यामुळं ठिकठिकाणी सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.दरम्यान, आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर केला आहे.
Gondia Rain : सलग दोन दिवस गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशी गोंदिया जिल्ह्याला हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला आहे. आज जिल्ह्यात सर्वदूर अतिमुसळधार पावसाचे संकेत हवामान खात्याचे दिले आहेत. त्यामुळं पुढील काही तास अति महत्वाचे मानले जात आहेत. आधीच्या आलेल्या पावसाने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. शेकडो एकर शेतीचे नुकसान झाले आहे.
Palghar Rains : पालघर जिल्ह्याच्या सर्वच भागात पहाटेपासून पावसाने मुसळधार हजेरी लावली असून जिल्ह्यातील अनेक भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली असून नालेही तुडुंब भरुन वाहत आहेत. दरम्यान पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट जाहीर केला आहे.
Mumbai Rains : मुंबईत पहाटेपासून सुरु असलेला मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये एक कार पाण्यामध्ये वाहून गेली. पहाटे पाचच्या सुमारास एका कारमधून एक महिला, पुरुष आणि मुलगा असे तीन जण पूर्वेकडून ते पश्चिमेला जात हते. पण सबवे खाली चार ते पाच फूट पाणी भरल्यामुळे कार गटारमध्ये वाहून गेली. सबवेजवळ तैनात असलेल्या मुंबई पोलीस आणि महापालिकेच्या लाईफ गार्ड्सनी कारची काच फोडून तिघांना सुखरुप बाहेर काढलं. ही कार अजूनही नाल्यात अडकलेली आहे. सध्या मुंबई महानगरपालिकेच्या जनरेटरच्या माध्यमातून सबवेमधून पाणी काढण्याचं काम सुरु आहे. पाणी भरल्यामुळे पहाटेपासून अंधेरी सबवे वाहनांसाठी आणि इतर नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे.
Mumbai Rain : मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. या पावसामुळं अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं आहे. या पाण्यात एक कार वाहून गेल्याची घटना घडली आहे. पहाटे पाचच्या सुमारास कारमधून एक महिला पुरुष आणि एक मुलगा असे तीन जण अंधेरी पूर्वकडून पश्चिमेला जात असताना सबवेखाली चार ते पाच फूट पाणी भरल्यामुळे कार गटारामध्ये वाहून गेली आहे. सबवे जवळ तैनात असलेले मुंबई पोलीस आणि पालिकाचे लाईफ गार्ड यांनी कारचं काच फोडून तिघांनाही सुखरुप रेस्क्यू केलं आहे. कार अजूनही नाल्यामध्ये अडकली आहे. सध्या मुंबई महानगरपालिकाचे जनरेटरच्या माध्यमातून सबवेमधून पाणी काढण्याचं काम सुरु आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी भरल्यामुळे पहाटेपासून अंधेरी सबवे वाहनांसाठी व इतर नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे.
Satara Rains : कोयना, महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासात कोयना धरणात 4 टीएमसी पाणी साठा वाढला. कोयना धरणात सध्या 50 हजार क्युसेक्सने पाण्याची आवक होत आहे. 24 तासात कोयना परिसरात 226 मिलिमिटर पाऊस तर महाबळेश्वरमध्ये 197 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या संकेतानुसार मध्यरात्रीपासून भंडारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्याला हवामान खात्याच्या ऑरेंज अलर्ट मिळाला असल्याने 9 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत हवामान खात्याचे दिले आहेत. त्यामुळं पुढील काही तास अति महत्वाचे मानले जात आहे. जिल्ह्यातील धरणं तुडंब भरली असून, नदी नाले ओसांडून वाहत असल्यानं भंडारा जिल्हा प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आहे.
Vasai Virar Rains : वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे शहरातील सखल भागामध्ये पाणी भरले आहे. रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या वाहनातही पाणी शिरलं आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन बंद पडत आहेत. आज मोहरमनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे शाळा कॉलेज बंद आहेत. तर रस्त्यावर पाणी सचल्याने काही रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षा बंद ठेवल्या आहेत. दिवसभर पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नागरिकांची चिंता वाढू शकते.
बुलढाणा जिल्ह्यात मेहकर, लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे. याव्यतिरिक्त जिल्ह्यात इतर सर्व तालुक्यात रिमझिम पाऊस झाला आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे.
Solapur rain : सोलापुरात मागील काही दिवसात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. शहरात कालपासून सुरू झालेल्या पावसाने अद्यापही उसंत घेतलेली नाही. सलग दुसऱ्या दिवशी पडणाऱ्या संततधार पावसामुळं जिल्ह्यातील छोट्या नद्या, ओढे , नाले ओसंडून वाहत आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, उडीद आदी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, आणि ज्यांनी पिक विमा घेतला आहे त्यांनी 72 तासाच्या आत इन्टीमेशन लेटर द्यावे असे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे करण्यात आले.
Sangli Rains : शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे चांदोली धरणाचे चार वक्राकार दरवाजे उचलून पाणी सांडव्यातून 1300 तर विद्युत निर्मितीतून 1700 असे एकूण 3000 क्यूसेक्सने वारणा नदीत पाणी सोडले जात आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन लागली आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. कोकरुड-रेठरे बंधारा पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद झाली. मुसळधार पावसाचे प्रमाण वाढल्यास आणखी विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा चांदोलीच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणाचे चारही दरवाजे सोमवारी खुले इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.
Mumbai Rain : जोरदार पावसामुळं अंधेरी सबवे इथं 2 फुटापर्यंत पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सदर वाहतूक एस.व्ही. रोडकडे वळवण्यात आली आहे. (तिवारी चौक ते अंधेरी रेल्वे स्टेशन).
Parbhani Rain : परभणी जिल्ह्यात 8 दिवस उघडीप दिल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा पुनरागमन केले आहे. सलग दोन दिवसांपासून संततधार पाऊस सर्वत्र बरसतोय. काल रात्री पालम, पुर्णा, जिंतूर आणि गंगाखेड तालुक्यात पावसाचा जोर जास्त होता. त्यामुळं छोट्या नद्या,ओढ्या नाल्यांना पुन्हा पाणी आल्यानं पालममधील 8 गावांचा संपर्क तुटला असून येलदरी आणि लोअर दुधना प्रकल्पाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. लोअर दुधना प्रकल्पात 70% तर येलदरीत 80% पाणी साठा झाला आहे. दरम्यान, पावसाची अशीच संततधार राहिली तर शेती पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात काही भागात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. मुंबईसह परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. तसेच मराठवाडा आणि कोकण पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, 11 ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. पुढील दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोल्हापूर पाऊस
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या दमदार पावसाने पंचगंगा नदी पुन्हा एकदा पात्राबाहेर पडली आह. राजाराम बंधारा पाणी पातळी 33 फूट 2 इंच इतकी आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी 39 फूट व धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत 58 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, दुधगंगा धरणाचे सांडव्यावरील 5 वक्राकार दरवाजे उघडले असून, त्यातून 423 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. तसेच पॉवर हाऊसमधून 1 हजार क्युसेक्स असा एकूण 1 हजार 423 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे.
मराठवाडा पाऊस
मराठवाड्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आणखी दोन दिवस पावसाचा मराठवाड्यात मुक्काम असणार आहे. हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं आधीच ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली असताना, आता पुन्हा दोन दिवस पाऊस बरसणार असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज नांदेड, जालना, हिंगोली व परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर 10 ऑगस्ट रोजी औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
बीड जिल्ह्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळं नदी नाल्यातून पाणी वाहताना पाहायला मिळाले. सोबतच लातूर जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. दुपारच्या सुमारास तब्बल दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी असल्याचे चित्र होते.
महत्त्वाच्या बातम्या:
- Almatti Dam : अलमट्टी धरण 95 टक्के भरले, 72 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु
- Maharashtra Rain Update : राज्यभरात 11 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाचा इशारा, कोणत्या भागाला कोणता अलर्ट?
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -