Maharashtra Rain Live Updates :कोयना धरणाच्या विद्युत प्रकल्पातून 2,100 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
Maharashtra Rain Live : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या विद्युत प्रकल्पातून 2100 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा नदीला पूर आला आहे. उकणी गावात पुराचे पाणी शिरले आहे. अप्पर वर्धा आणि लोअर वर्धा धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हयातील वणी तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीला पूर स्थिती निर्माण झाली असून उकनी गावात पाणी शिरले आहे. काही घरात सुद्धा पाणी गेल्याची माहिती आहे. त्यामुळं गावातील संपूर्ण रस्ते जलमय झाले. नागरिकांनी 2 ते 3 फूट पाण्यातून चालत जाऊन मार्ग काढावा लागत आहे. जनावरांच्या गोठ्यात पाणी असल्याने चारा सुद्धा नष्ट झाला. ऐका महिन्यात दुसऱ्यांदा या गावाला पुराच्या पाण्याचा तडाखा सहन करावा लागला. या भागातील शेतात ही मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने पिकांचे ही नुकसान झाले.
Akola Rain : अकोला जिल्ह्यातील पुर्णा नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे जिल्ह्यातील गांधीग्राम येथील पुर्णा नदीच्या पुलावर पाच फुट पाणी आहे. यामुळं अकोला-अकोट रस्ता बंद झाला आहे. या परिस्थिमुळे अकोटच्या जिल्हा मुख्यालयासोबतचा संपर्क तुटला आहे. यासोबतच अकोटला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील खंडवा, बर्हाणपुर, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीचा अकोल्यासोबतचा संपर्कही तुटला आहे. जिल्ह्यात आजही पावसाची रिपरिप सुरु आहे. यामुळं पूर परिस्थित वाढ होण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून संततधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यात सर्वत्र भागात संततधार पाऊस कोसळत असून समुद्र खवळलेला असून मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन केले आहे. देवगड बंदरात मुंबई आणि गुजरातमधील 61 बोटी समुद्रात उधाण असल्याने गेल्या तीन दिवसांपासून आश्रयाला आहेत. जिल्ह्यातील तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 377.995 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 84.49 टक्के भरले आहे. सध्या या धरणातून एकूण 6 हजार 278 क्युसेक्स विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
Kolhapur Rain : पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यासाठी एनडीआरएफ जवानांच्या दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून एनडीआरएफच्या या टीम कोल्हापूरमध्ये तळ ठोकून आहेत. आज रक्षाबंधन आहे. या पवित्र सणाच्या दिवशी आपल्या रक्षणासाठी आलेल्या एनडीआरएफ जवानांना कोल्हापुरातील महिला भगिनींनी राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सोहळा पार पाडला आहे. एनडीआरएफचे जवान हे आपलं रक्षण करण्यासाठीच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आले आहेत. त्यामुळं त्यांना राखी बांधून या जवानांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न कोल्हापुरातील महिलांनी केला आहे. एनडीआरएफच्या जवानांनी देखील या महिला भगिनींचे आभार मानून आमच्या सर्व जवानांना अशाच पद्धतीने प्रेम मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कोयना धरण पायथा विद्युत गृहातून दुपारी 3 वाजता 2 हजार 100 क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. कोयना नदीमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळं कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. सदर विसर्ग पूर्वेस सोडण्यात आला असून, त्याचा चिपळूण अथवा वाशिष्ठी नदीतील विसर्गाशी कोणताही संबंध नाही.
Akola Rain : सध्या अकोला जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे अनेक नदी नाले तुडुंब वाहत आहेत. यातच जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथील नाल्याला काल पूर आला होता. रस्त्यावरील पुलावरुन पुराचे पाणी गेल्याने मूर्तिजापुर ते पळसो बढे मार्ग बंद झाला आहे. पुरात एका दुचाकीस्वाराने पुलावरील पाण्यातून आपली दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला. पाण्याच्या वेगाने दुचाकीस्वार आपल्या दुचाकीसह वाहून गेल्यागी घटना घडली. मात्र, सुदैवाने या दुचाकीस्वारास पोहता येत असल्याने तो थोडक्यात बचावला. मात्र, त्याची दुचाकी पाण्यात वाहून गेली.
Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमधील कुल्लूच्या अन्नी ब्लॉकमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं अचानक आलेल्या पुरात एक इमारत वाहून गेल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळं ब्रम्हपुरी तालुक्यातील काही गावांना पुराचा फटका बसला आहे. वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या अर्हेर-पिंपळगाव आणि बेलगाव येथे शिरले पुराचे पाणी आले आहे. तर रणमोचन, चिखलगाव, बेटाळा, खरकाडा, चिंचोली या सारख्या नदी शेजारी असलेल्या जवळपास 15 गावातील शेत शिवरात पुराचे पाणी शिरलं आहे. सप्टेंबर 2020 मध्ये ब्रम्हपुरी तालुक्यातील वैनगंगेच्या किनारी असलेल्या गावांना पुराचा मोठा तडाखा बसला होता. त्यानंतर आता पुन्हा या गावांना पुराचा फटका बसला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळं ब्रम्हपुरी तालुक्यातील काही गावांना पुराचा फटका बसला आहे. वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या अर्हेर-पिंपळगाव आणि बेलगाव येथे शिरले पुराचे पाणी आले आहे. तर रणमोचन, चिखलगाव, बेटाळा, खरकाडा, चिंचोली या सारख्या नदी शेजारी असलेल्या जवळपास 15 गावातील शेत शिवरात पुराचे पाणी शिरलं आहे. सप्टेंबर 2020 मध्ये ब्रम्हपुरी तालुक्यातील वैनगंगेच्या किनारी असलेल्या गावांना पुराचा मोठा तडाखा बसला होता. त्यानंतर आता पुन्हा या गावांना पुराचा फटका बसला आहे.
Bhandara Rain : भंडारा जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं भंडारा जिल्ह्यातील जीवनदायीनी मानली जाणारी वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. धोक्याची पातली ओलांडून दीड मीटरवरुन नदीचे पाणी वाहत आहे. त्यामुळं भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, वैनगंगा नदीचे पाणी शहरात शिरु नये म्हणून, गोसे खुर्द धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून पावसाची संततधार सुरु आहे. अनेक नदी, ओढ्यांना पूर आला आहे.
Ahmednagar Rain : अहमदनगरमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळं धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. भंडारदरा धरण आज ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर वाढल्यानं पाण्याची आवक सुरु आहे.
Nagpur Rain : पुलावरुन नदीच्या पुराचे पाणी वाहत असेल तर तिथून वाहने नेऊ नका असे आवाहन वारंवार प्रशासनाने केले आहे. पुराचे पाणी पुलावरुन वाहत असताना वाहने घेऊन जाणे किती धोकादायक आहे. हे विविध दुर्घटनांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सतत समोर येत असते. नागपूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एक स्कॉर्पिओ अशीच पुराच्या पाणीत वाहून गेल्याने सहा जणांचा मृत्यू झाला होता. तरीही अनेकजण जीव धोक्यात घालून पुराचे पाणी वाहत असलेल्या पुलावरुन वाहने नेण्याचे धाडस करत आहेत. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात सांड नदीला पूर आला आहे. तरी काही ट्रक चालक सांड नदीच्या पुलावरुन पुराचे पाणी वाहत असताना ट्रक नेण्याचा जीवघेणा धाडस करत आहेत.
Nagpur rain : अतिवृष्टी आणि पुरामुळे नागपूर विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाचं कार्यक्षेत्र असलेल्या चारही जिल्ह्यांसाठी निर्णय घेण्यात आला आहे. चार दिवसांपासून विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. आजही पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी जवळपास स्थिर झाली आहे. गेल्या तीन तासात पाणी पातळी केवळ 1 इंचाने वाढली आहे. पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी 41 फूट 6 इंच इतकी झाली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
Mumbai Rains : मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई भागात रात्रभर अधूनमधून पावसाच्या सरी
सकाळच्या वेळी काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी पावसाची विश्रांती
रस्ते रेल्वे वाहतूक सुरळीत, कुठेही पाणी साचलेले नाही
पार्श्वभूमी
Maharashtra Rain Live Updates : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस पडत आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागपूर पाऊस
नागपूर जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. पोहरा नदीला पूर आल्यामुळं त्याचे विहीर गावात शिरलं आहे. या गावाच्या परिसरातील काही जण पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना NDRF च्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले आहे. या पावसामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
कोल्हापूर पाऊस
कोल्हापूर शहरामध्ये देखील जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ सुरुच आहे. राधानगरी धरणाचे आतापर्यंत स्वयंचलित चार दरवाजे उघडले आहेत. धरणाचे एकूण 4 दरवाजे (3,4,5,6 ) उघडले गेले आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने पंचगंगा नदीने मोसमात प्रथमच इशारा पातळी गाठली आहे. या पावसामुळं कोकणात जाणारे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -