नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून प्राप्तिकर विभागाच्या PAN 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाद्वारे क्यूआर कोड असलेली पॅन कार्ड जारी केली जाणार आहेत. या पॅन 2.0 प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या प्रश्नांनी उत्तर देण्यात आली आहेत. क्यूआर कोड असलेलं पॅन कार्ड जारी केल्यानंतर पॅन क्रमांक बदलणार नाही. याशिवाय जुनं पॅन कार्ड देखील वैध राहणार हे स्पष्ट झालं आहे.  


पॅन 2.0 काय आहे?


पॅन 2.0 प्रकल्प करदाता नोंदणी सेवांच्या व्यावसायिक प्रक्रियांची पुनर्अभियांत्रिकी करण्यासाठी आयटीडीचा एक ई-गव्हर्नन्स प्रकल्प आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करून पॅन सेवांचा दर्जा वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या प्रकल्पांतर्गत आयटीडी, पॅन वाटप/अपडेटेशन आणि सुधारणांशी संबंधित सर्व प्रक्रिया एकत्रित करत आहे. टॅन संबंधित सेवा देखील या प्रकल्पात विलीन केल्या आहेत. याशिवाय, ऑनलाइन पॅन प्रमाणीकरण सेवेद्वारे पॅन प्रमाणीकरण/वैधताकरण,  वित्तीय संस्था, बँका, सरकारी संस्था, केंद्र आणि राज्य सरकारी विभाग इत्यादींसारख्या वापरकर्त्या एजन्सींना उपलब्ध करून दिले जाईल.


पॅन 2.0 हे विद्यमान व्यवस्थेपेक्षा कसे वेगळे आहे?


मंचाचे एकत्रीकरण: सध्या पॅनशी संबंधित सेवा तीन वेगेवगळ्या पोर्टल्सद्वारे संचालित केल्या जातात (ई-फायलिंग पोर्टल, युटीआयआयटीएसएल पोर्टल आणि प्रोटीएन ई-गव्ह पोर्टल). पॅन 2.0 प्रकल्पात सर्व पॅन/टॅन संबंधित सेवा आता आयटीडीच्या एकल एकात्मिक पोर्टल वरुन संचालित होतील. वितरण, अद्ययावतीकरण, दुरुस्ती, ऑनलाईन पॅन प्रमाणीकरण (ओपीव्ही), नो युवर एओ, आधार- पॅन जोडणी, तुमच्या पॅनची सत्यता तपासा, ई- पॅन साठी विनंती, पॅन कार्ड पुन्हा छापून घेण्यासाठी विनंती अशा अनेक प्रकारच्या पॅन आणि टॅनशी संबंधित सर्व सेवांसाठी हे नवे पोर्टल उपयुक्त असेल.
 
कागदविरहित प्रक्रियांसाठी तंत्रज्ञानाचा सर्वसमावेशक वापर: विद्यमान पद्धतीऐवजी संपूर्णतः कागदविरहित ऑनलाइन प्रक्रिया
 
करदात्यांसाठी सुविधांमध्ये सुलभता: पॅनसंदर्भातील वितरण/अद्ययावतीकरण/दुरुस्ती या सेवा मोफत असतील आणि ई-पॅन कार्डधारकाच्या नोंदणीकृत मेल आयडी वर पाठवले जाईल. प्रत्यक्ष स्वरूपातील पॅनकार्ड मिळवण्यासाठी अर्जदाराला देशांतर्गत प्रकारात 50 रुपयांच्या विहित शुल्कासह विनंती सादर करावी लागेल. भारताबाहेर हे कार्ड पाठवण्यासाठी 15 रुपये अधिक इंडिया पोस्टचे नियमानुसार होईल, ते शुल्क अर्जदाराला भरावे लागेल.
 


विद्यमान पॅन कार्ड धारकांना अद्ययावत प्रणालीअंतर्गत नव्या पॅन साठी अर्ज करावा लागेल का? पॅन क्रमांकात बदल होईल का?
 
नाही, विद्यमान पॅन कार्ड धारकांना अद्ययावत प्रणालीअंतर्गत (पॅन 2.0)नव्या पॅन साठी अर्ज करावा लागणार नाही.
 


लोकांना पॅनमधील नाव, स्पेलिंग्स, पत्त्यातील बदल इत्यादी दुरुस्त्या करण्याचा पर्याय उपलब्ध आहे का?
 
होय, विद्यमान पॅन कार्ड धारकांना त्यांच्या सध्याच्या पॅनमधील ईमेल, मोबाईल क्रमांक किंवा पत्ता अथवा नाव, जन्मतारीख यासारख्या तपशीलात बदल/ अद्ययावतीकरण करायचे असल्यास त्यांना पॅन 2.0 प्रकल्प प्रत्यक्ष अंमलात आल्यानंतर ते मोफत करता येतील. पॅन 2.0 प्रकल्प सुरु होईपर्यंत पॅन कार्ड धारकांना खालील लिंक्सचा वापर करून ईमेल, मोबाईल आणि पत्त्यातील अद्ययावतीकरण/दुरुस्तीसाठी आधार क्रमांकावर आधारित ऑनलाईन सुविधेचा लाभ घेता येईल:
    i.        https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserAddressUpdate.html 
   ii.        https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/homeaddresschange 
 
याखेरीज पॅन कार्ड मधील इतर कोणत्याही अद्ययावतीकरण/दुरुस्तीसाठी कार्ड धारकाला प्रत्यक्ष केंद्राला भेट देऊन किंवा शुल्कासह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून त्याचे काम करून घेता येईल.
 


पॅन 2.0 अंतर्गत मला माझे पॅन कार्ड बदलावे लागेल का?
 
नाही, जर पॅन कार्ड धारकाला कोणतेही अद्ययावतीकरण/दुरुस्ती करायची नसेल तर त्याचे पॅन कार्ड बदलणार नाही. पॅन 2.0 अंतर्गत सध्याच्या वैध पॅन कार्डची वैधता कायम राहील.


अनेक लोकांनी कार्डावरील त्यांचे पत्ते बदललेले नाहीत आणि त्यावर जुनाच पत्ता अजूनही आहे. मग नवे पॅन कसे वितरीत होईल? नवे पॅन कार्ड कधी वितरीत होईल?
 
पॅन कार्ड धारकाने त्याच्या विद्यमान पॅन मध्ये कोणतेही अद्ययावतीकरण/ दुरुस्ती करण्याची विनंती केलेली नसेल तर नवे पॅन कार्ड वितरीत केले जाणार नाही. जुना पत्ता बदलून अद्ययावतीकरण करू इच्छिणाऱ्या पॅन कार्ड धारकांना आधार क्रमांकावर आधारित ऑनलाईन सुविधा केंद्रात खालील लिंक्सचा वापर करून पत्त्यातील बदल मोफत करून मिळेल:


    i. https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/homeaddresschange 
   ii. https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserAddressUpdate.html 
 
त्यानुसार, पॅनच्या डाटाबेस मध्ये नवा पत्ता अद्ययावत केला जाईल.


इतर बातम्या :



PAN 2.0 Project : मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?