मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात महाराष्ट्रातील अनेक भागांत महापुराने मोठं नुकसान होतं. कधी नद्यांचं रौद्ररूप तर कधी रस्त्यांवर पाणी, यामुळे आता या नुकसानाला निसर्गाने बदललेलं स्वरूप कारणीभूत आहे की माणसाने विकासकामं करताना केलेल्या चुका यावरून चर्चा रंगली आहे. 


गेल्या काही दिवसांत सांगलीकरांची झोप उडवली असून त्याचं कारण आहे तुफान बरसणारा पाऊस आणि नद्यांनी धारण केलेलं रौद्ररुप. पश्चिम महाराष्ट्राची गंगोत्री अशी ओळख असलेल्या कृष्णा नदी काठोकाठ भरून वाहू लागलीय. तर येत्या काही दिवसांत ती पात्र ओलांडून नागरी वस्तीत शिरण्याचा धोका निर्माण झालाय. नदीने रौद्ररूप धारण केल्याने सांगली जिल्हा प्रशासनही सतर्क झालंय. 


सांगलीसोबत कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीनेही आक्राळविक्राळ रूप धारण केलंय. त्यामुळे काही नदीकाठच्या काही गावांचं नुकसान झालंय. मात्र आता पंचगंगेच्या या रौद्ररुराला प्रशासन आणि कंत्राटदारांची चूक असल्याचा आरोप होऊ लागला आहे.


नागपुरात पूरपरिस्थिती भीषण 


हे तर झालं नदीच्या काठी वसलेल्या सांगली आणि कोल्हापूरचं. पण तिकडे उपराजधानी नागपुरातही मुसळधार पावसाने मोठं नुकसान झालंय. 6 तासात 217 मिली मीटर पाऊस झाला. त्यामुळे नागपुरात पूरस्थिती निर्माण झाली. यात अनेकांच्या घरात पाणी शिरलं, अनेक व्यावसायिकांच्या दुकानाचं मोठे नुकसान झाले. मात्र ही पूरपरिस्थिती भीषण व्हायला जी भर पडली ती नागपूर शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या रस्त्यांमुळे.  


अयोध्या नगर भागातील नाल्याला आलेल्या पुराने साई मंदिर परिसर पाण्याखाली गेला.  तेथील नागरिकांच्या घरातील साहित्याचे, धन धान्याचे, कागदपत्राचे मोठे नुकसान झाले. एकूणच माणसाच्या चुकांमुळे निसर्गाचा समतोल आधीच बिघडून गेलाय. त्यामुळे हा निसर्ग अनेकदा रौद्ररुप धारण करतो आणि पुन्हा माणसाच्याच चुकीच्या विकास धोरणामुळे लोकांचं नाहक नुकसान होतं. म्हणूनच चुका टाळून नुकसानाचं हे चक्र भेदावं लागेल.


ही बातमी वाचा: