मुंबई गेल्या महिन्यापासून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजा अखेर सुखावला आहे. मागील 24 तासात राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Maharashtra Rain) झाला आहे. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार झाला आहे.  खरीप हुकला पण रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. येवला, मनमाड, मालेगाव, नांदगाव, चांदवडसह ग्रामीण भागात पावसाची दमदार हजेरी लावली आहे. गणेशोत्सव काळात बळीराजा सुखावला आहे. 


मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा


 परभणी जिल्ह्यातील मनवत भागात मागील  तासात 130 मिमी पाऊस, अंबेजोगाई, मोमिनाबाद परिसरात 90 मिमी, अंबड आणि बदनापूर भागात 70 मिमी पावसाची नोंद झाली आहे. नगर जिल्ह्यात देखील मागील 24 तासात धुवांधार पाऊस  झाला आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्यात देखील मागील 24 तासात अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे.


नाशिकच्या येवला अंदरसुल भागात मुसळधार


मागील दोन दिवसांपासून नाशिकच्या येवला अंदरसुल भागात मुसळधार तर नांदगाव, मनमाड, मालेगाव आदी भागात संथगतीने पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाने ओढ दिल्यामुळे खरीपाचा पूर्ण हंगाम वाया गेला होता..जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतं चालला होता.परंतु, गणेशोत्सव काळात पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजाला ' गणपती बाप्पा पावला ' असेच म्हणावे लागेल.


सलग दुसऱ्या दिवशी मालेगाव, येवला, नांदगाव, मनमाड, चांदवड आदी भागात मेघ गर्जनेसह उत्तरा नक्षत्राच्या जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला मात्र आता सुरू झालेल्या पावसामुळे ' रब्बी ' च्या आशा पल्लवित झाल्या आहे.


हिंगोली जिल्ह्यात पावसाची हजेरी


 हिंगोली जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लावली. पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. काही प्रमाणात पिकांना दिलासा मात्र अजूनही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.


आष्टी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस


मोठ्या विश्रांतीनंतर बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला आहे पावसामुळे तालुक्यातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. बावी शिवारामध्ये पूराच्या पाण्यात पाच शेळ्या आणि काही जनावरं वाहून गेल्याची घटना घडली आहे.


विदर्भासाठी सर्वत्र यलो अलर्ट जारी


राज्यात पुढील तीन ते चार दिवस सर्वत्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होत असल्यानं विदर्भासह उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस विदर्भासाठी सर्वत्र यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच कोकणात 26 सप्टेंबर रोजी चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे.


हे ही वाचा :