Maharashtra Rain Update : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील पाच दिवसात मुसळधार पाऊस (IMD Rain Alert) पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही ठिकाणी यलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशीही पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. आजपासून पुढील पाच दिवस मुंबई, ठाणेसह राज्यात पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचं आयएमडीने सांगितलं आहे.


येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज


मुंबईत मान्सून दाखल झाला असून मुंबईकरांना पावसानं चांगलंच झोडपलं आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघरमध्ये येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच येत्या आठवड्याभरात मान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे.हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत साधारणपणे  ढगाळ आकाश आणि शहर आणि उपनगरात गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. 


कुठे ऑरेंज, तर कुठे यलो अलर्ट


ठाणे, रायगड, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असून आज 10 जून रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज आणि उद्या कोकणासह दक्षिण आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस तसेच मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 






विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता


कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 50-60 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.